रामजन्मभूमी आणि वर्तमान पिढी!

    दिनांक :14-Nov-2019
|
सर्वेश फडणवीस
8668541181
 
गेल्या पाच शतकांपासून हिंदूंच्या 25 हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, ज्या सहस्त्रावधी हिंदूंनी प्रभू श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलिदान केले, ज्या कोट्यवधी हिंदूंनी आपले आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या मंदिरासाठी भावपूर्ण प्रार्थना केल्या, उपासना केली, जीवनभर व्रतस्थ राहिले, तो ऐतिहासिक क्षण काळाचे द्वार ठोठावत होता. भविष्यातील तो भावविभोर करणारा सुवर्णक्षण अखेर दृष्टीस पडला, कारण सर्वोच्च न्यायालयाने अनेक वर्षांपासून असलेल्या वादग्रस्त जागी राम मंदिराची स्थापना होईल हा ऐतिहासिक निर्णय 9 नोव्हेंबरला दिला. आता येणार्‍या काही काळात तिथे भव्य मंदिर निर्माण होईल. समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग होता. विशेषतः तरुणांचा सहभाग हा सोशल मीडियावर अधिक व्यापक आणि प्रगल्भ व वैचारिक होता. 

  
 
तरुण हा शब्दच ऐकला की डोळ्यांपुढे उत्साह, जिद्‌द, प्रचंड सामर्थ्य, बुद्धिमत्ता, काम करण्याची क्षमता, ठरवले ते मिळवण्याची ताकद असे अनेक गुणांनी समृद्ध असे व्यक्तिमत्त्व उभे राहते. मानवी जीवनातील सगळ्या उत्तुंग गुणांचे साक्षात साकार दर्शन म्हणजे भगवान श्रीराम आहेत.
  
सामान्य माणसाला आणि विशेषतः तरुणांना श्रीरामांच्या जीवनातून खूप काही घेण्यासारखे आहे. मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण मानव म्हणून राम चरित्र आहे. रामाचे जीवन सर्वच बाबतीत आदर्श आहे. समाजातील लोकांना संघटीत करून संस्कारीत करायचे असेल तर रामचरित्राच्या अभ्यासाने भारतीयांचे व तरुणाईचे चारित्र्य सुधारेल यात मुळीच शंका नाही. कोठारी बंधू या तरुणांचा रामजन्मभूमीसबंधित लढ्यात अभूतपूर्व मोलाचा वाटा आहे. प्रभू श्रीरामचंद्र हे महामानव, महापुरुष वाटतात. त्यांच्याकडे पूर्ण मानव, आदर्श मानव म्हणून बघू शकतो आणि केवळ पूजा, नमस्कार एवढाच आपला संबंध न राहता त्यांचे जीवन आचारणाचा प्रयत्न करावा लागेल. 
 
प्रभू श्रीरामचंद्र हेच राष्ट्राचे चैतन्य आहे. राष्ट्र निमार्णासाठी भक्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहे. राम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राम हे समिकरणच आहे. प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवी जीवन सुखकर होण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले. श्री रामजन्मभूमी आंदोलन हे राष्ट्राचे आत्मतेज जागृत करणारी घटना आहे. लाखो हिंदूंनी, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवत भव्य मंदिरासाठी तन, मन, धन संपूर्ण समर्पित भावनेने लढा दिला. श्रीरामजन्मभूमीवर आता भव्य मंदिर निर्माण होणार आहे. आज अतिशय वेगवान माध्यम रोज बदलत असताना या देशात भक्ती हा राष्ट्र उभारणीच्या कामातील संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून समोर आले व श्रीरामजन्मभूमी आंदोलनाने हे दाखवून दिले आहे. राष्ट्रपुरूष श्रीरामांच्या सर्वांगीण चारित्र्याचा आदर्श आपण सर्वजण आपला ध्येयविषय बनवूयात आणि या अनेक ऐतिहासिक निर्णयाचे साक्षीदार आपण झालो तर वर्तमान पिढीने येणार्‍या पिढीला हा गौरवशाली इतिहास सांगण्याचे कार्य आपल्यावरच आहे.
 
जय श्रीराम !