व्होडाफोन भारतातून गाशा गुंडाळणार नाही

    दिनांक :14-Nov-2019
|
नवी दिल्ली,
केंद्र सरकारने भारतातून गाशा गुंडाळण्याबाबत व्होडाफोन समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता रीड यांनी यु-टर्न घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून भारतात गुंतवणूक सुरूच ठेवण्यास इच्छूक असल्याचे स्पष्ट केले आहे. लंडनमध्ये जारी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे रीड यांनी आपल्या स्पष्टीकरण या पत्रात दिले आहे. तसेच भारतीय माध्यमांशी बोललो नव्हतो असेही त्यांनी नमूद केले आहे. 

 
 
 
दोन दिवसांपूर्वी, एक तर सरकारने दूरसंचार उद्योग क्षेत्रात हस्तक्षेप टाळावा आणि मुकेश अंबानी यांच्या जिओशी 4 जी सेवांबाबत उमदेपणाने स्पर्धेला मुभा दिली जावी अन्यथा अशा गोंधळाच्या स्थितीत व्होडाफोन-आयडियाला शेवटचे पाऊल टाकावे लागेल. भारतात व्यवसाय वाढीला वाव दिसत नसल्याने, नव्याने गुंतवणूक करण्याचा कुठलाही इरादा नाही. रिलायन्स जिओला सरकारकडून झुकते माप दिले जात असून समन्यायी स्पर्धेला वाव नाही, असे रीड यांनी म्हटल्याचा दावा बि‘टिश माध्यमांनी मंगळवारी केला होता.
 
 
दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने उच्चस्तरीय सुत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारकडून निक रीड यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर निक रीड यांनी सरकारला लिहिलेल्या आपल्या पत्रामध्ये दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यामुळे रीड यांच्या या विधानामुळे व्होडाफोन भारतातून आपला गाशा गुंडाळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.