अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आणला शेतकऱ्याचा मृतदेह

    दिनांक :14-Nov-2019
|
विष पिऊन केली आत्महत्या
 
अमरावती, 
सततच्या नापिकीमुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. येथील ग्रामस्थांनी शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत मिळावी, या उद्देशाने त्या शेतकऱ्याचा मृतदेह गुरुवार 14 नोव्हेंबरला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर कर्जही असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 
 
सुधाकर महादेवराव पाटेकर (वय-47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 13 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता सुधाकर पाटेकर यांनी शेतात जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. यावर्षी त्यांनी त्यांच्या तीन एकर शेतामध्ये सोयाबीन पेरले होते. पावसामुळे त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक पुर्णपणे वाया गेले. ते आर्थिक अडचणीत आले. जवळ पैसे नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न कसे करावे? अशा विवंचनेत सुधाकर पाटेकर होते.
दरम्यान, महिनाभरा पूर्वीच त्यांच्या आई आणि वडिलांचे निधन झाले होते. या सर्व संकटामुळे ते हतबल होते. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाचे डोंगर वाढत असताना आता नेमके काय होणार याची कुठलीही शाश्वती नसल्याने आणि शासनाकडून अजुनही मदत मिळाली नसल्याने ते चिंतेत होते. त्यामुळे सुधाकर पाटेकर यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
शासनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सिद्धनाथपूर येथील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्यांची बाजू जाणून घेतली व मदतीचे आश्वासन दिले आहे.