मुंगी साखरेचा रवा...

    दिनांक :14-Nov-2019
|
समिधा पाठक
7276583054
 
रविवारी सकाळी हातात कॉफीचा कप घेऊन आठवणींची एकेक शेंग सोलत बसली होती. सार जीवन एका चित्रपटासारखे डोळ्यासमोर उभे राहिले. आठवणी कोणत्याही असो, कशाही असो वर्तमान काळाला लुटून नेण्याचे जबरदस्त सामर्थ्य त्यांच्यात असते आणि विशेषतः रम्य आठवणी रंगवण्यात भान हरपून जातं. तेवढ्यात फोनची रिंग वाजली आणि मी भानावर आले. बालमैत्रिणीचा फोन होता. तिला म्हटले, मी आज तुझे काहीच ऐकणार नाहीये, तयार हो आपण फिरायला जाऊ. ती म्हणाली आज काय हे असे अचानक? मी म्हटले, काळाने बालपण हिरावून घेतले, पण बालमन तर नाही ना! चल आज बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊ या आणि मग त्यादिवशी आम्ही यथेच्छ व निःसंकोचपणे बालपणीची दंगा मस्ती केली. 

 
 
बालपण म्हणजे चैतन्यान प्रीतीला साक्षी ठेवून घेतलेला अलगद हुंकार. बालपण म्हणजे निर्मळ झरा... बालपण म्हणजे विश्वास! बालपण म्हणजे साधना पूर्तीचा ध्यास! बालपण म्हणजे ज्ञानाची पिपासा, बालपण म्हणजे जगण्याची उमेद. बालपण म्हणजे आकांक्षा व आशेचे अमर्याद क्षितीज! म्हणून तर म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, आठवतो घडी घडी. आपले अगदी सगळेचं हट्‌ट पुरवल्या जायचे. आपल्या आई बाबांच्या पिढीने जेवढे एन्जॉय केले, तेवढे आपण नाही करू शकलो, कारण त्यांचे बालपण हे निसर्गाच्या सानिध्यात गेले. बाललीलांचे कौतुक करायचे आई बाबा व नातेवाईक! आई रोज एक आवडीचा पदार्थ करायची, बाबा दौर्‍यावर गेले की काही ना काही नक्कीच आणायचे. आजी आजोबा वाढदिवशी हमखास यायचे, मित्रांबरोबर घरात धिंगाणा घालायची परवानगी मिळायची आणि मुख्य म्हणजे कसली जबाबदारी नाही की कसला ताण नाही.
 
 
उत्स्फूर्तता व आशावाद अगदी बळकट होता! जिद्‌द होती, पण कोणाला डावलून पुढे जाणे हे मान्य नसायचे. आई, बाबा, शिक्षक जे सांगतील त्यावर विश्वास होता, समाधान होते, अस्मिता होती, खूप छोट्या गोष्टी मोठा आनंद देऊन जायच्या. प्रेम नैसर्गिक होते, द्वेष कालांतराने शिकवल्या गेला. किती निरागस, निर्मळ आणि स्वच्छंदी होतो ना आपण! द्वेष, मत्सर, असूया मिलो दूर होते. गट्‌टी फू चालायची, पण अबोला कधी फार काळ धरलाच नाही जायचा. फक्त प्रेम आणि आपुलकीचे साम्राज्य होते. पण मग या प्रेमाच्या साम्राज्यावर इगोने आक्रमण केले, मॅच्युरिटीने आपले कुंपण घातले आणि आयुष्याचे क्षितिज संकुचित केले.
 
 
प्रोफेशनलिझमचा टॅग गळ्यात घालून फिरू लागलो. जिज्ञासेवर घात झाला, खोड्यांना व मस्तीला मॅनर्सचा विळखा बसला. सिरीयस जगायला लागलो एकदम आणि आयुष्याची मजा गेली! समाज काय म्हणेल या भीतीने आपल्यातील बालकाला आपण स्वतःच दाबले. कशाला आलेय आपल्याला हे शहणपण? हरवलेय त्यात आपले सुंदर बालपण!
 
 
वेळ, अनुभव माणसाला खूप काही शिकवून जातात पण त्याचा फरक आपल्यातील बालकाला होऊ देता कामा नये. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला कोणता टॅक्स लागतोय्‌? मग का रोकायचे आपल्यातील बालकाला? त्याला मनसोक्त खेळू देऊ, बागडू देऊ तो खूश की आपण खूश! ‘बचपन छिन लिया पर बचपना तो अपनेही पास है जी’! उद्याची काळजी न करता, आज मनसोक्त जगणार्‍या आपल्यातील बालकाला पुन्हा एकदा जागृत करूया. तसेच ज्या बालकांच्या नशिबी बालपणाच्या सोनेरी काळात अंधार आहे त्यांचे आयुष्य देखील वात्सल्य, आधार व शिक्षणाच्या साहाय्याने उज्जवल करूया.