अश्विनच्या फिरकीची जादू; कुंबळे, भज्जीच्या रांगेत मिळवले स्थान

    दिनांक :14-Nov-2019
|
इंदूर,
भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत खेळताना आज एक मैलाचा टप्पा ओलांडला. बांगलादेशचा कर्णधार मोमेनुल हक याला बाद करत अश्विननं भारतीय मैदानावर २५० कसोटी बळी टिपण्याचा पराक्रम केला. माजी फिरकीपटू अनिल कुंबळे व हरभजन सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा अश्विन हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसंच, ४२ व्या कसोटीत २५० बळी घेण्याच्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाचीही त्यानं बरोबरी केली आहे.

 
 
घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळे याच्या नावावर आहे. कुंबळेनं ६३ कसोटी सामन्यांत ३५० बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर हरभजन सिंगनं ५५ कसोटी सामन्यांत २६५ गडी बाद केले आहेत. २५० बळींचा टप्पा ओलांडून अश्विन या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, अश्विननं अवघ्या ४२ व्या कसोटीतच हा टप्पा ओलांडला आहे.
भारताकडून घरच्या व विदेशी मैदानांवर मिळून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्याच नावावर आहे. त्यानं ६१९ बळी घेतले आहेत. त्याच्या पाठोपाठ कपिल देव यांचा क्रमांक आहे. त्यांनी ४३४ बळी घेतले आहेत. तर, हरभजन सिंग ४१७ बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. अश्विनच्या एकूण कसोटी कारकिर्दीचा आढावा घेतल्यास त्याची कामगिरी खूपच आश्वासक आहे. त्यानं ६९ सामने खेळताना ३५८ गडी बाद केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीनं ३५० बळी घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.