बच्चू कडूंच्या अटकेचा प्रहार कार्यकर्त्यांकडून निषेध

    दिनांक :14-Nov-2019
|
तीव्र आंदोलनाचा इशारा
 
अमरावती, 
नापिकी, अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत मदत मिळावी, यासाठी आमदार बच्चू कडू यांनी 14 नोव्हेंबरला राज भवनासमोर आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी बच्चू कडू यांना अटक केली आहे. या अटकेच्या विरोधात प्रहार संघटनेचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यपालांचा निषेध नोंदवला.
 
 
 
मुंबई येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करणारे आमदार बच्चू कडू यांना अटक झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. अमरावती शहरात प्रहार कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. अमरावती जिल्ह्यातसह संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचा तारणहार म्हणून आमदार बच्चू कडू मैदानात उतरले आहेत. अशात त्यांना अटक करणे हा शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचे प्रहार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राज्यपालांचा निषेध नोंदवला.
आमदार बच्चू कडू यांची सुटका झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रहारचे अमरावती शहराध्यक्ष चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, राजू बागडे, उमेश पांडे, बंडू उंबरे आदी सहभागी होते.