गोंदिया रेल्वेस्थानकावर १० किलो सोने जप्त

    दिनांक :15-Nov-2019
|
 रेल्वे पोलीस व आयकर विभागाची कारवाई
 
गोंदिया,
गोंदिया रेल्वेस्थानकाच्या फलाट क्र. ५ वर मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेसने आलेल्या दोन इसमांकडून ३ कोटीपेक्षा जास्त किमतीचे १० किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गोंदिया रेल्वे पोलीसांनी १४ नोव्हेंबर रोजी केली. दरम्यान रेल्वे पोलीस व आयकर विभागाचे अधिकारी अधिक तपास करीत असून तपासाअंती हे सोने चोरीचे की, तस्करीचे हे समोर येणार आहे.
मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस फलाट क्रमांक ५ वर ११.३० वाजता आली असता फलाटावर असलेल्या रेल्वे सुरक्षा पोलीसांचे प्रवाशांच्या हालचालीवर बारीक लक्ष होते. अशात विदर्भ एक्सप्रेसच्या वातानुकुलीत डब्ब्यातून दोन इसम एका मोठ्या ट्रॉली बॅगसह खाली उतरले. यावेळी रेल्वे पोलीसांना त्यांचा सशंय आल्याने चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जवळील बॅग उघडण्यास नकार दिला. त्यामुळे पोलीसांचा संशय अधिक बळावला व त्यांनी दोन्ही इसमांना पकडून रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. यावेळी चौकशीत एका व्यापाऱ्याने आपण मुंबई येथील सोने वितरक असल्याचे सांगितले. मात्र बॅग उघडण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्यांच्याजवळील बॅग उघडली. बॅगमध्ये आकर्षक पॅकेट व डब्ब्यामध्ये बांगड्या, झुमके, अंगठ्या, ब्रेसलेट, नेकलेस, गोफ आदी सोन्याचे दागिने आढळून आले. यावेळी त्यांनी संशयीत इसमांना या दागिन्याचे बील मागितले असता त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे बील वा कागदपत्रे नव्हती. दरम्यान रेल्वे पोलीसांनी याप्रकरणाची माहिती गोंदिया व नागपूर आयकर विभागाला दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व सोने जप्त केले. तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर जप्त केलेले सोने १० किलोपेक्षा जास्त व ३ कोटी पेक्षा जास्त किमतीचे असल्यात आले असून अधिक तपास सुरु आहे. ही कारवाई महिला पोलीस अधिकारी  खेडेकर, सहायक पोलीस निरीक्षक पंकज चकरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी भिमटे, वानखेडे, सलोटे, मुन्ना चौबे, चंदू भोयर यांनी केली.
 
 
 
 
सराफा बाजारात खळबळ
आयकर विभागाच्या चौकशीत दोन्ही इसमांनी ते गोंदिया कोणकोणत्या सराफा व्यापाऱ्यांकडे डिलेव्हरी देण्यासाठी आले होते, याची माहिती दिली नाही. मात्र, दोन्ही इसमांचे गोंदिया येथील काही सराफांंना त्यांचे फोन जाताच ते रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचले व दोन्ही इसमांची बाजू घेऊन बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी स्थानिक सराफांचे म्हणणे धुडकावून लावले. या प्रकारामुळे त्या इसमांचे गोंदिया सराफा बाजाराशी काय संबंध आहेत, हा प्रश्न देखील समोर आला आहे. त्यामुळे सराफा बाजारामध्ये खळबळ उडाली आहे.
 
आयकर विभागाच्या कारवाईकडे लक्ष
याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आज, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर आयकर विभागाचे एक पथक गोंदियात पोहोचले आहे. सध्या याप्रकरणी भादंवि १०२ सीआरपी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत जप्त केलेले सोने चोरी की तस्करीचे हे निष्पन्न झाल्यावर दोन्ही इसमांना अटक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.