व्हेरीकोज व्हेन्स’ हा भारतात मोठ्या प्रमाणावर आढळणारा विकार आहे. दर वर्षी देशातल्या जवळपास 10 लाख लोकांमध्ये ही समस्या निर्माण होते. व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे नसा फुगणं किंवा त्यावर सूज येणं. या आजाराचं वाढतं प्रमाण पाहता जागरूक राहणंं गरजेचं ठरतं.
ओळख
निरोगी व्यक्तीच्या शरीरातल्या झडपा रक्त प्रवाही ठेवण्यास, एका ठिकाणी साठवून न ठेवण्यास किंवा मागच्या दिशेने वाहू न देण्यास सक्षम असतात. पण व्हेरीकोज व्हेन्समध्ये या झडपा खराब आणि कमकुवत होतात. यामुळे रक्त एका ठिकाणी साठून राहतं. नसांमधील रक्तपुरवठ्यावर परिणाम झाल्याने ही समस्या निर्माण होते. व्हेरीकोज व्हेन्स शरीराच्या कोणत्याही भागात विकसित होण्याची शक्यता असली तरी पावलं किंवा पायांच्या नसांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. सतत चालल्याने किंवा उभं राहिल्याने पायांवर ताण येतो परिणामी पायांच्या नसा कमकुवत होत जातात आणि व्हेरीकोज व्हेन्सची समस्या निर्माण होते.
कारणं
वाढत्या वयात नसांमधल्या झडपा कमकुवत झाल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते. यामागे आनुवांशिक कारणं असू शकतात. स्थूलपणा हे व्हेरीकोज व्हेन्सचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. हालचाल किंवा व्यायामाच्या अभावामुळे नसांवर ताण येऊ न व्हेरीकोज व्हेन्स तयार होतात. गरोदरपणात रक्तदाब वाढल्याने तसंच गर्भाशय प्रसरण पावल्याने नसांवर ताण येऊ न व्हेरीकोज व्हेन्सची शक्यता वाढते.
लक्षणं
व्हेरीकोज व्हेन्समध्ये वेदना होतातच असं नाही. बरेचदा प्रभावित भाग जांभळट निळसर दिसतो. तसंच त्या भागातल्या नसा वळलेल्या आणि फुगीर दिसतात. व्हेरीकोज व्हेन्स झालेल्या भागात खाज सुटणं, त्वचेचा रंग बदलणं, व्हेरीकोज व्हेन्सच्या भागातल्या त्वचेचा रंग गडद होणं, त्वचा कोरडी पडणं, त्वचेचा थर पातळ होणं अशी लक्षणं आढळतात. पायांना खाज येणं, जडत्त्व जाणवणं, पायाच्या खालच्या भागात जळजळ, स्नायूंमध्ये गोळा येणं, सूज येणं, बराच काळ उभं राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर पायांमध्ये असह्य वेदना जाणवणं, व्हेरीकोज व्हेन्समधून रक्तस्राव होणं, नसांचं काठिण्य, रंग बदलणं, घोट्यालगतच्या त्वचेेचा दाह किंवा त्या भागात त्वचेचा अल्सर होणं अशी लक्षणं दिसली तर तुम्हाला रक्तवाहिन्यांशी संबंधित गंभीर आजार असण्याची शक्यता वाढते. हा त्रास टाळण्यासाठी झोपताना पाय उंचावर ठेवावे. वजन नियंत्रणात ठेवावं.