‘लिव्ह इन’चे काही खरे नाही!

    दिनांक :15-Nov-2019
|
प्रा. मधुकर चुटे
 
विवाह म्हणजे दोन कुटुंबांचे मिलन मानले जाते. नेमका हाच फरक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. परस्परांशी पटले तर राहणे नाही तर विभक्त होणे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेच लोक राहतात जे वैवाहिक आयुष्य तर जगू पाहतात, पण जबाबदारी घेणे टाळतात. कुठलेही पाऊल उचलण्याआधी समाज काय म्हणेल, याचाच आधी विचार केला जातो. जर एका स्त्रीशी लग्न होऊन दुसरीबरोबर संबंध ठेवणे या बाबीचा विचार केला, तर समाजाने अशा संबंधांना कधीच मान्यता दिली नाही. भारतात द्विभार्या प्रतिबंधक हा कायदा अंमलात आहे. एखाद्याचे विचार व स्वभाव न जाणून घेता आपण लग्न करून फसलो, तर त्यापेक्षा लिव्ह इन रिलेशनशिपला तरुण-तरुणी पसंती देतात. 

 
 
लिव्ह इन रिलेशनशिपबाबत आपल्या समाजात उलटसुलट मते आहेत. अजूनही आपल्या समाजाने ते अधिकृत रीत्या मान्य केलेले नाही. कारण ते आपल्या संस्कृतीत नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयानुसार लग्नासाठी पात्र असलेला म्हणजेच एकवीस वर्षांवरील मुलगा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित असेल तर तो राहू शकतो आणि एकवीस वर्षांचा झाल्यावरदेखील त्याला लग्न करायचे आहे की नाही, हा पूर्णपणे त्याचा निर्णय असणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही काळानंतर दुरावा निर्माण झाल्यास िंकवा दोघांमध्ये मतभेद होऊन वेगळे झाल्यास त्या महिलेला पोटगी देण्याची तरतूददेखील कायद्यात करण्यात आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना पुरुष आणि महिलेने सहसंमतीने शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर पुरुषाने जर लग्नाला नकार दिला तर तो बलात्कार नाही, असे कायदा सांगतो.
 
 
अमेरिकेत हे तर सामान्य आहे. रशियात अनेक जोडपी लिव्ह इन रिलेशनशिपला पसंती देतात. लिव्ह इन रिलेशनशिपनंतर त्यांना विवाह करण्याची परवानगी आहे. येथील जोडपी लग्नाआधी सोबत राहतात आणि त्यानंतर ते स्वतःचा विवाह नोंदणीकृत करतात. या अंतर्गत चर्चमध्ये सामूहिक विवाह केले जातात. 2005 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार, ऑस्ट्रेलियातील 22 टक्के जोडपी ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती, तर 2018 मध्ये विवाह करणार्‍या जोडप्यांपैकी 78 टक्के जोडपी ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी होती. युरोपमधील अनेक भागात हे सामान्य आहे. केवळ तरुणच नाही, तर कोणत्याही वयातील जोडपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. बांग्लादेशात लिव्ह इन रिलेशनशिप चुकीची मानली जाते. येथे लग्नाशिवाय एकत्र राहणे सामाजिक आणि कायदेशीर स्तरावर मान्य नाही. तसे आढळल्यास त्याला घर आणि विद्यापीठातून हाकलून देण्यात येते. पोलंडमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी कुठलाही करार व नोंदणी न करतादेखील कायद्याने एकत्र राहता येते. मात्र, मालमत्ताविषयक प्रश्न, त्यांच्या मुलांकडून आई-वडिलांची सुरक्षितता, आजारपणात सांभाळ अशी चिंता व्यक्त केली जाते.
 
 
लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच लग्नाशिवाय सहजीवन ही फक्त पाश्चात्त्य जीवनपद्धती राहिलेली नाही, तर अलीकडे हा सहजीवनाचा प्रकार आपल्या देशामध्येही पाहायला मिळतो. देशातील मोठ्या शहरामध्ये राहणारी मुले-मुली करीअरच्या एका टप्प्यावर असताना लग्नाची जबाबदारी नको म्हणून हा मार्ग पसंत करतात. कारण आपले स्वातंत्र्य कुणी हिसकावून घेऊ नये, अशी विचारसरणी आधुनिक पिढीत निर्माण होत आहे. या संवेदनशील विषयावर सर्वांचीच मते वेगवेगळी आहेत. जर एक तरुणी आपल्या आई-वडिलांच्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे होणार्‍या पतीशी तासभर बोलून लग्नास होकार देऊन पस्तावणार नाही याची खात्री आहे का? कारण तासभर कुणीही चांगले बोलू शकते. लग्नानंतर जोडीदाराचा खरा स्वभाव कळला, परंतु आता या चुकीची शिक्षा ती भोगत बसणार. त्या वेळी सामाजिक व न्यायिक बेड्या पडलेल्या असतात. मग रोज वाद घालणे िंकवा विभक्त होऊन घटस्फोट घेणे, हे दोन पर्याय उरतात. पण, हे दोन्ही पर्याय त्रासदायक ठरतात. लिव्ह इन रिलेशनशिप हे तरुणांना खूप सोपे, वरवरचे वाटत असले तरी त्यातही गुंतागुंत आहे. एकमेकांमध्ये भावनिक गुंतवणूक किती ठेवायची, हे स्पष्ट हवे. नाहीतर एक जोडीदार भावनिक गुंतागुंतीत अडकतो आणि दुसरा जोडीदार न अडकल्यामुळे समजा तो किंवा ती त्या जोडीदाराला सोडून गेली तर बांधून ठेवण्यासाठी कोणतीही सामाजिक कायदेशीर बंधने एकमेकांना नसतात आणि आयुष्यभर तू-तू मैं-मैं असेल, तरीही कित्येक जोडपी एकमेकांना आधार देऊन आपले जीवन जगतात.
 
 
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तो पुरुष शेवटपर्यंत किंवा ती स्त्री वृद्धापकाळापर्यंत एकत्र तरी असतील का, हाच मुख्य प्रश्न असतो. तरुणपणात जबाबदार्‍या नकोत, बंधने नकोत, फक्त मौजमजेसाठी अशी ही सहजीवन पद्धत आहे आणि त्यातील धोके, फायदे समजूनच पावले उचलली तरच ते योग्य ठरते.
 
 
आपल्याकडे अद्यापही कुंडल्या पहिल्या जातात. ठरावीक गण जुळतात काय, ते पहिले जाते. त्याशिवाय लग्न होत नाही. अशा कल्पना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नाहीत. भारतीय कुटुंबात खेड्यात अजून पुरुष अर्थार्जन करतो आणि स्त्री ही गृहिणी म्हणजे तिला काहीच स्थान नाही. तिच्या जबाबदार्‍या या गौण आहेत. येथे पुरुषी वर्चस्वाला प्राधान्य असते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोघेही कमवत असल्यामुळे ज्या क्षणी तो हिंसाचार किंवा पुरुषी वर्चस्व दाखवेल, त्या क्षणी स्त्री त्याला सोडू शकते. हुंडाबळीचा प्रश्नच उद्भवत नाही. परदेशात शिकलेल्या उच्च शिक्षित मुली-मुले आज अरेंज मॅरेज करण्यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपविषयी विचारणा करतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनेतून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, आज इथे अन्‌ उद्या तिथे, ही अवस्था निश्चितच निर्माण होते.
 
9420566404