मुलीला वाढवताना...

    दिनांक :15-Nov-2019
माधुरी साकुळकर
 
काळानुसार स्त्रीजीवन बदलले. त्यात जाणीवपूर्वक किती प्रयत्न झाले आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे किती बदल झाले, हा भाग अलहिदा! बदललेल्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीला अनुसरून आई-वडिलांनी मुलीला वाढवताना पालकत्वाच्या कलेत बदल मात्र नक्की करायला पाहिजे.
 
 
पालकांच्या उदारवादी दृष्टिकोनामुळे मुलींची सकारात्मक स्वप्रतिमा तयार होते. स्वतःचा विचार एक स्त्री म्हणून न करता एक व्यक्ती म्हणून ती करायला लागते. समाजात वावरताना तिला तिच्या स्त्रीत्वाची अडचण होत नाही की, ती स्वतःच्या स्त्रीत्वाचा बाऊही करीत नाही. ‘मी अबला आहे, मला कुणाच्या संरक्षणाची, आधाराची गरज आहे,’ असे तिला वाटत नाही.
 
 
पालक जर सुजाण नसतील, तर मुली झुरळाला, पालीलाही घाबरतात. स्त्री म्हणून वेगळ्या सवलती मिळाव्या, अशी अपेक्षा करतात. स्त्रीदाक्षिण्याची अपेक्षा करतात. स्त्री-पुरुषांसाठी एकच रांग असेल तर कटकट करतात. प्रवासात कुणीतरी आपलं जड सामान उचलावं, आपल्याला बसायला जागा द्यावी, अशी अपेक्षा करतात. (आजारी, गरोदर, वृद्ध स्त्रियांना अर्थातच जागा द्यायलाच पाहिजे.)
 
 
आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये, मालिकांमध्ये स्त्रीची वास्तव प्रतिमा फारच कमी वेळा चितारलेली असते. ती एकदम सतीसावित्रीसारखी पतिपरमेश्वर मानणारी किंवा एकदम स्त्रीत्वच नाकारणारी किंवा स्त्रीत्वाचा बाऊ करणारी अशी चितारलेली असते. पण जे आहे ते असं आहे, स्त्री दासीही नाही आणि देवताही नाही माणूस आहे, हे मुलींना समजवण्यासाठी सतत चर्चा, चांगल्या मालिकांवर, चित्रपटांवर घरात व्हायला पाहिजे. काय नको होतं हे सांगताना काय हवं होतं हे सांगायला पाहिजे.
 
 
बुद्धिवाद, विवेकवाद, विज्ञाननिष्ठा शिकवताना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायला पाहिजे. पूर्वी आपण मातृत्वाचे अतिगोडवे गायचो. स्त्री ही आदर्श माताच असायला पाहिजे. तिने वर्चस्वाचे बलिदान देऊन मातृत्व निभवावे, अशी अपेक्षा असायची. पूर्वी हे ठीक होते. स्त्रियांना दुसरे मार्ग नव्हते. केवळ चूल आणि मूल हेच तिचे कार्यक्षेत्र होते. पण, आता? स्त्रियांच्या कार्यकक्षा विस्तारल्या आहेत. याचा अर्थ, मातृत्व कमी प्रतीचं आहे, असं नाही. ती एक सहजसुंदर नैसर्गिक घटना आहे. पण, मातृत्वाचे उदारीकरण केल्यामुळे निपुत्रिक स्त्रीला जगणे कठीण होते. तिचं मानसिक आरोग्य बिघडतं. मूल होण्यासाठी ती नाही नाही ते उपाय करते. आजकाल तर एकच मूल किंवा मूलच नको, असा पर्याय मुली निवडतात. 

 
 
आपण मुलींना मन मारण्याचे शिक्षण देतो. ‘‘तू अशी वाग, तू तशी वाग, तुला सासरी जायचे आहे, तुला सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागेल नाहीतर आमचा उद्धार होईल,’’ असे बहुतेक आया सांगतात. सतत जुळवून घे, याला खूश कर, त्याला खूश कर, यात स्वतःच्या कल्पना, विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायचा प्रश्नच निर्माण होत नाही. किंबहुना मुलींना स्वतःचं मतच नसावं, या मताचेच काही पालक असतात. नवर्‍यांना तर बायका हो ला हो करणार्‍या, अर्ध्या वचनात राहणार्‍या आवडतात. चुकीचं पालकत्व मुलींना हवं तसं बहरू देत नाही. यातून बंडखोरीचा जन्म होतो. सगळं नाकारायचं, झुगारून द्यायचं, मन मानेल तसं वागायचं, ही प्रतिक्रिया असते.
 
 
सहनशीलता आणि त्याग ही आदर्श मूल्ये आहेत, पण यात तारतम्य महत्त्वाचे आहे. याबाबत स्त्रिया फारच टिपीकल वागतात. शिळं, अपुरं जेवण घेतल्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या सुरू होतात. जिच्या आधारावर संपूर्ण घर उभं आहे, तिचं आरोग्य चांगलं राहायलाच हवं. सकस, पौष्टिक, परिपूर्ण आहाराशिवाय ते कसं शक्य आहे? राष्ट्रजीवनाची, समाजजीवनाची पहिली पायरी म्हणजे घर. ते घर संस्कारित, सक्षम राहण्यासाठी गृहीणीसुद्धा सुदृढ हवी. राष्ट्रसेवेचे उपकरण म्हणजे शरीर. ते नीट राहायलाच हवे.
 
 
आजकालच्या आया मुलींना सांगतात, ‘‘तू फक्त अभ्यास कर, करीयर कर. नोकरी लागली की दहा नोकर ठेव कामाला.’’ घरकाम कमी प्रतीचे आहे. श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन ही मूल्ये बिंबवली जातच नाहीत. प्रत्येकाला, स्त्री असो की पुरुष, स्वतःपुरते, कुटुंबापुरते शिजवता आलेच पाहिजे. नोकर मिळत नाहीत. सुट्‌ट्या घेतात. ऐनवेळेवर येत नाहीत. विश्वासू, आजार नसलेले, पौष्टिकता आणि व्हिटॉमिन्सची जाण असलेले नोकर दुरापास्तच. त्यांना आपल्या चवीचा स्वयंपाक शिकवायला आपल्याला तर आलाच पाहिजे. हॉटेलातून किती दिवस मागवणार?
 
 
मुला-मुलींशी सतत संवाद, त्यांच्या मनातलं जाणून घेणं, त्यांना वास्तवाची जाणीव करून देणं, लग्नाबद्दलच्या त्यांच्या भन्नाट कल्पना, डेस्टिनेशन वेिंडग, परदेशात हनीमून, वेलफर्निश्ड घर, कमीत कमी माणसं घरात असणं, इत्यादी कल्पनांबद्दल त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. ‘मॅरेज सागा’चं भूत डोक्यावरून उतरवणं, मुख्य म्हणजे आपल्या आर्थिक स्थितीची योग्य ती जाणीव मुलींना करून देणं आवश्यक आहे. आपल्या लग्नासाठी पैसे जमा करताना वडिलांनी काय काय त्याग केला, पैसे कुठून आणले, हे जर मुलींना कळले तर त्या झगमगाटाचा आग्रह धरणार नाहीत.
 
 
साधनस्वरूप असलेल्या देहाकडे दुर्लक्ष करू नकोस तसेच देहाचे फाजील लाडही करू नकोस, हे मुलींना आवर्जून सांगायला हवे. आजकालच्या मुलींकडे पाहिल्यावर जाणवतं की, त्या स्वतःकडे नको तितकं लक्ष देतात. देहसौंदर्याबद्दल खूप जागरूक असतात. केवळ शोभेच्या वस्तू, कचकड्याच्या बाहुल्या किंवा देहस्विनी होण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता मानतात. यात आईवडिलांचा दोष आहे. लहानपणापासूनच मुलींना इतके कमी कपडे घालतात की, नट्यांना वाटावे आपण खूपच कपडे घालतो. आईवडील मुलींना प्रमाणाबाहेर नटवतात.
 
 
समानता, स्वातंत्र्य या शब्दांचे योग्य ते अर्थ मुलींना समजावून सांगितले पाहिजे. जेंडर सेंसेटायझेशन आधी पालकांचे झाल्यास ते मुलांना योग्यप्रकारे वाढवतील. समानता म्हणजे पुरुषांची बरोबरी नव्हे, तर परस्परपूरकता, परस्परपोषकता, परस्परावलंबन! स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर जास्त जबाबदारीनं वागणं.
 
 
चूक होईल म्हणून निर्णय घ्यायला घाबरू नकोस. चुकांमधूनदेखील शिकता येतं, हे आवर्जून सांगायला पाहिजे. आपल्याकडे मुली, स्त्रिया निर्णय घ्यायला घाबरतात. निर्णय चुकला तर? आणि निर्णयाबरोबर येणार्‍या जबाबदार्‍यांचं काय? यापेक्षा दुसर्‍या कुणीतरी घेतलेल्या निर्णयांचं निर्बुद्धपणे पालन करणं सोपं! कारण नवी आव्हानं स्वीकारणं, आल्या परिस्थितीला तोंड देणं, मुख्य म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणे, या गोष्टी मुलींना शिकविल्याच कुठे जातात? सहचरी होण्यापेक्षा अनुगामिनी होण्याचंच शिक्षण दिलं जातं. जे काय शिकवलं जातं, जे काय संस्कार होतात ते अगदी उलटेच, परंपरेला चिटकून राहण्याचे. म्हणूनच स्त्रिया सहसा बदलायला तयार नसतात.
 
 
कुठल्याही मोहाला बळी पडू नकोस, कुणी चॉकलेट जरी दिलं तरी घ्यायचं नाही. ‘हायवे’मध्ये आलिया भट आपले अनुभव सांगते किंवा पिंकी विराणीचं ‘बिटर चॉकलेटस्‌’ या विषयावर आहे. तुझ्या शरीरावर फक्त तुझाच अधिकार आहे. तुझ्या मनाविरूद्ध कुणी स्पर्श केल्यास काय करावे, हे सांगायला पाहिजे. ‘रिबन’ हा कुल्कीचा अप्रतिम चित्रपट आहे. मुलगी झाल्यावर आईचं आयुष्य कसं बदलतं आणि मुलीला वाढविण्यात येणार्‍या अडचणी सांगितल्या आहेत.
 
 
आणखी एक, कधीकाळी बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलीस, तर स्वतःला गुन्हेगार समजू नकोस. त्यात तुझा काहीही दोष नाही. तू बळी आहेस. तो एक अपघात समजून कामाला लाग. अपघातात हात, पाय गमावले तर आपण स्वतःला गुन्हेगार समजत नाही. नॉर्मल आयुष्य काही काळानंतर जगायला लागतो. तसेच लैंगिक गुन्ह्याच्याबाबतीत समजायला पाहिजे.
 
 
वर्तमानपत्रातल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचून मुलीचे पालक म्हणून आपण धास्तावलेले असतो. पण मुलींना ते जाणवू देत नाही, नाहीतर त्यासुद्धा कायम धास्तावलेल्या राहतील. प्रत्येक पुरुषावर संशय घेतील, सिनिक होतील. त्यांना या सिनिसिझमपासून वाचवणं पालकांचं काम आहे. निकोप स्त्री-पुरुष संबंध असू शकतात. समाज आपण समजतो तितका वाईट नाही, हे मुलींना सांगणं हे पालकांचं कर्तव्य आहे. त्यांना आत्मकेंद्रिततेच्या कोषातून बाहेर काढून समाजाभिमुख करणं, चांगल्या माणसांच्या, चांगल्या कामाच्या मागे नैतिक पाठबळ उभं करावं लागतं. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आर्थिक मदत करावी लागते आणि राष्ट्र प्रथम इत्यादी गोष्टी पालकांनीच बिंबवाव्या लागतात...
9850369233