आत्मविश्वास

    दिनांक :15-Nov-2019
|
प्रॉक्सी थॉट
पल्लवी खताळ-जठार
 
आत्मविश्वास असणे आणि आत्मविश्वास नसणे हा कुठेतरी आपल्या बिलिफ सिस्टीमचाही भाग आहे. त्यामुळे खिशात दोन हजारांची नोट असण्याने, पायात बूट घातल्याने, कडक इस्त्रीची साडी, ब्रँडेड शर्ट या गोष्टी करून समाधान मिळाले, छान वाटले, तात्पुरता फायदा झाला तर ते करायला हरकत नाही; पण मग आज खिशात नोट नाही म्हणून गर्भगळीत होण्याची वेळ येणार असेल, तर हा वरवरचा आत्मविश्वास काही कामाचा नाही. 

 
 
 
सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे नेमके काय रे भाऊ? कुठे मिळतो तो? हा आत्मविश्वास वाढविण्याच्या काही गोळ्या किंवा टॉनिक मिळते का कुठे? रिचार्ज करता येतो का तो? किती दिवस टिकतो? हे.. हे असले फालतू प्रश्न तुम्हाला पडत नाहीत; पण अनेकदा असे प्रसंग येतात ना आपल्याही आयुष्यात? म्हणजे प्रेझेंटेशन आहे नव्या प्रोजेक्टचे किंवा महत्त्वाची परीक्षा वा फायनल इंटरव्ह्यू आहे.. पहिल्यांदाच कुठल्या क्लाएंटला भेटणार आहे.. तिला प्रपोज करायचे आहे.. लोनसाठी ब्रँच-मॅनेजरसोबत मीटिंग आहे.. रिसर्च गाइडला भेटायचेय.. फायनल व्हायची आहे.. पहिल्यांदाच लांबच्या प्रवासाला विमानाने निघाली आहे.. घरात खूप पाहुणे येणार आहेत.. असे कितीतरी छोटे-मोठे प्रसंग येतात. अशावेळी मनात प्रचंड घालमेल चाललेली असते. सगळे व्यवस्थित होईल ना अशी शंका सारखी सतावते. आत्मविश्वास थोडा कमी पडतोय, की काय असे वाटते. धडधड वाढलेली असते. घाम फुटतो. घशाला कोरड पडते. पोटात गोळा येतो. झोप येत नाही. मनात चलबिचल होत असते. कुणाशीच बोलू नये असे वाटते. हे असे केव्हा तरी आपण प्रत्येकाने अनुभवले आहे आणि त्यावेळी एकदा तरी मनात येते, की- पाहिजे होती बुवा आत्मविश्वासाची एखादी गोळी किंवा असायला हवा होता एखादा स्पेशल चार्जिंग पॉईंट कॉन्फिडन्सचा.
 
 
खरे तर, यातले काहीही वेळेवर उपटलेले नसते. अगदी व्यवस्थित आधीपासून माहिती असते, की ही वेळ येणार आहे. तयारीही केली असते आपण मनापासून. फूल चाज्र्ड बॅटरी असते आपली. पण.. पण.. कधी काहीतरी वेळेवर लोचा होतो आणि मग आत्मविश्वास घालवायला आजूबाजूला असलेल्या क्षुल्लक गोष्टीही पुरेशा ठरतात. म्हणजे बघा-तुम्ही असे छान तयार होऊन घरून आता निघणार असता (एरवी देवाला नमस्कार वगैरे तुम्ही करणार नसता, पण आज कशी कोणास ठावुक; पण देवघराकडे नजर जाते) आणि अचानक ऐनवेळी पाऊस सुरू होतो. झाले! गेला ना आत्मविश्वास! डोक्यात ताबडतोब विचार येतो, इतकी महत्त्वाची मीटिंग आणि आजच या पावसाला यायचे होते? नेमके माझ्याच बाबतीत असे का होते? किंवा कधीतरी आपल्याला हवा असलेला शर्ट/साडी/ड्रेस नेमक्या वेळी कपाटात मिळत नाही. (कारण ते धोब्याकडे इस्त्रीला दिलेलं असतं.) गेला की नाही आत्मविश्वास! नेमकी जाताना चप्पल तुटली.. आज ती/तो दिसली/दिसला नाही.. मोबाईल नेमका चार्ज करायचा राहिला.. तो/ती पाहून हसला/हसली नाही.. ऐनवेळी गाडीतले पेट्रोल संपले.. ट्रॅॅफिक जाममध्ये गाडी अडकली.. कॅबवाल्यांचा आजच नेमका संप.. हजारो कारणे असतात आजूबाजूला ही अशी, आपला अर्जुन करणारी आणि मग जशी टायरमधून हवा उतरावी ना, तसा आत्मविश्वास फुस्स होत जातो अक्षरश: आपल्यापासून दूर. सगळी मेहनत वाया जाणार, मिळालेली चांगली संधी आपण गमावणार असे वाटू लागते.
 
 
अनेकदा हा असा आत्मविश्वास खच्ची झाला, की डायरेक्ट डिप्रेशनमध्ये जाणारेही खूप दिसतात. मी डिप्रेशनमध्ये जाऊन आलो, असे काही जण तर एखाद्या मॉलमध्ये जाऊन आल्यासारखे सांगतात. इतके सोपे आणि कॉमन झाले आहे हे हल्ली. अजुर्नासारखी ‘सीदन्ति मम गात्राणी, मुखंच परीशुष्यते!’ अशी अवस्था झाल्यावर स्वत:च स्वत:चे कृष्ण होऊन धीर देणारेही अनेक आहेत आपल्या आजूबाजूला. अशा विशिष्ट परिस्थितीला सामोरे जाताना ते स्वत:च स्वत:ला सूचना (सेल्फ सजेशन्स) देतात. यासाठी छोटे छोटे मार्ग/क्लृप्त्‌या त्यांनी शोधून काढलेल्या असतात. त्यामुळे आहे ती परिस्थिती बदलणार नाही; पण त्या परिस्थितीकडे आपण वेगळ्या विश्वासाने बघू हे त्यांना पुरते ठावूक असते.
 
 
एखादा पदार्थ छान जमला, की डार्क लिपस्टिक लावल्यावर.. टाइट फिटिंगचा ड्रेस घातल्यावर.. सकाळी जीममध्ये जाऊन वर्कआउट केले, प्राणायाम केला, वॉकला जाऊन आले की.. कडक प्रेसची साडी घातल्यावर.. क्लीन शेव्ह केली की.. व्यवस्थित हेअरस्टाइल केली तर.. खिशात पैशाचे पाकीट असेल तर.. हलका मेकअप करून छान तयार झाले की.. जबाबदारी घेऊन स्वतंत्रपणे एखादी गोष्ट करायला मिळाली की.. सकारात्मक प्रतिसाद मिळाला की.. कामाच्या ठिकाणी उत्साही आनंदी वातावरण असेल तर.. नव-याने तारीफ केली की.. कामाची पूर्व तयारी चांगली झाली असेल तर.. ठरल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित होत गेले तर.. या आणि यांसारख्या छोट्या-छोट्या गोष्टी करून आपल्यासारखे अनेक लोक स्वत:च स्वत:चा आत्मविश्वास वाढवतात.
 
 
मग आत्मविश्वास दाखवावा लागत नाही. तो आपोआप दिसतो. दिसतो, तुमच्या बोलण्यातून, हावभाव, देहबोली, नजर, ताठ चालण्याची-बसण्याची पद्धत, स्पष्ट उच्चारांमधून दिसतो, तुमच्या दृष्टिकोनातून, मत-धारणा-विचार-विश्वास या सगळ्या सगळ्यांमधून दिसतो. तो आपल्याला जगण्याची ऊर्मी देतो. ऊर्जा देतो. स्वत:च्या कृती आणि निर्णयांवर विश्वास ठेवला, तर हाती घेतले त्या कामात आनंद आणि समाधान निश्चित मिळते. मग काम हे ओझे वाटत नाही. त्याचे दडपण येत नाही. इतर बाह्यकारणाने आत्मविश्वास डगमगत नाही आणि हो, आत्मविश्वासाची एखादी गोळी मिळते का? हे ऑनलाईन शोधावे लागणार नाही.
संस्कृत शिक्षिका, सेंटर पॉईंट स्कूल, नागपूर