घरचं तूप वापरताना...

    दिनांक :15-Nov-2019
|
अनेकांकडे घरी लोणकढं तूप वापरलं जातं. हे तूप शुद्ध असलं तरी वेळेत संपवणं गरजेचं असतं. घरचं तूप बराच काळ वापरलं तरी चालतं, असा आपला समज असतो. पण तो चुकीचा आहे. बाहेरच्या तुपावर एक्सपायरी डेट असते. त्याच पद्धतीने ठराविक कालावधीनंतर घरचं तुपही खाण्यासाठी अयोग्य ठरतं. अधिक काळ टिकण्यासाठी तूप योग्य पद्धतीने साठवावं लागतं. पण तूप साठवणं आणि खाणं याबाबत आपण साध्या चुका करत असतो. आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. तूप घरचं असो किंवा बाहेरचं, ते कधीपर्यंत खायचं आणि कसं साठवायचं याविषयी... 

 
 
  • घरी कढवलेलं तूप बरणीत ठेवायचं असेल आणि साधारण तीन महिने पुरवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायला हवं. रोजच्या वापरासाठीचं तूप छोट्या भांड्यात काढून ठेवलं तरी त्यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
  • कोणताही वास येत नसेल तसंच रंग बदलला नसेल तर घरचं तूप वर्षभर किंवा त्याहून थोडा अधिक काळ वापरता येतं. पण हे तूप तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ वापरायचं असेल तर फ्रीजमध्येच ठेवायला हवं.
  • हवाबंद डबा किंवा बाटलीतलं तूप स्वयंपाकघरात ठेवता येतं. पण बाटली किंवा डबा थंड आणि अंधार्‍या जागी ठेवावा.
  • घरचं तूप हवाबंद बरणीत असेल तर वर्षभरानंतरही वापरता येईल. पण एक्सपायरी डेटनंतर बाहेरचं तूप अजिबात वापरु नये.
  • तूप घरचं असो किंवा बाहेरचं... ते स्वच्छ आणि कोरड्या बरणीत साठवायला हवं. काढण्यासाठी स्वच्छ आणि कोरड्या चमच्याचा वापर करायला हवा.