गोंडवाना विद्यापीठातील शेतकर्‍यांच्या मुलांचे शिक्षण शुल्क माफ

    दिनांक :16-Nov-2019

चंद्रपूर,
हातातोंडाशी आले असताना उभे पीक जमिनदोस्त झाले. ओल्या दुष्काळाने राज्यासह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचेही कंबरडे मोडले. गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणार्‍या या दोन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची मुले शिक्षण घेतात. येत्या परीक्षेचे शुल्क आता कसे भरावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असतानाच, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांच्या सर्व मुलांना येत्या परीक्षेचे शुल्क माफ केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. 

 
 
 
शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सिनेटच्या सभेत औचित्याचा मुद्दा उचलत संजय रामगिरवार यांनी, ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी विनंती सभाध्यक्षांना केली होती. कुलगुरूंनीही या मागणीचे स्वागत केले आणि लगेच त्यांच्या शिक्षण शुल्क माफीची घोषणा केली. तत्पूर्वी, अभाविपच्या कार्यकत्यार्र्ंनी कुलगुरूंना शुल्क माफीचे एक निवदेनही सादर केले होते. मुंबई आणि अमरावती विद्यापीठापाठोपाठ आता गोंडवाना विद्यापीठानेही हे स्वागतर्ह पाऊल उचलले आहे.
  
 
गोंडवाना विद्यापीठाने 13 कोटी 38 लाख 10 हजार 336 रुपयांत ज्या 9 खाजगी जमिनी खरेदी केल्या होत्या, त्या नवीन मुल्यांकन दरानुसार प्रत्यक्षात 8 कोटी 30 लाख 9 हजार 503 रुपयांतच खरेदी करायला हव्या होत्या. त्यामुळे आता यातील 5 कोटी 8 लाख 825 रुपयांची तफावत विक्रीदारांकडून तातडीने वसूल करण्याचा ठरावही या सिनेट सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
 
 
गडचिरोली विद्यापीठ परिसरासाठी 78.95 हे. आर. एवढी खाजगी जमीन 57 कोटी 46 लाख 88 हजार 109 रुपयांत खरेदी करण्यात येणार होती. मात्र, सिनेट सदस्यांच्या आक्षेपानंतर आणि त्यांच्या चौकशी अहवालानंतर या जमिनींच्या पूर्नमुल्यांकनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेल्या सुधारित दरानुसार, आता या जमिनींची प्रत्यक्ष किंमत ही 41 कोटी 26 लाख 70 हजार 851 रुपये निश्चित झाल्याने, यापुढच्या या सर्व जमिनींच्या व्यवहारात साधारणत: 15 कोटी 19 लाख 17 हजार 258 रुपयांची मोठी बचत होणार आहे. हे केवळ आणि केवळ सिनेट सदस्यांच्या रेट्यामुळे झाले असून, या मुल्यांकनात ज्यांनी घोळ घातला, त्या मुल्यांकन समितीच्या सदस्यांवर कारवाई व्हावी, असा ठरावही या सिनेट सभेत पारित करण्यात आला. तसे पत्र आता कुलगुरू डॉ. कल्याणकर हे जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या या जमीन खरेदीचा बहुचर्चित घोटाळा राज्याच्या विधान परिषदेतही गाजला असून, या गंभीर विषयावर ‘एसआयटी’ची घोषणा करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी विभागीय चौकशीचे आदेश दिले गेले आहे, हे विशेष.
 
 
तसेच यापुढे गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणार्‍या सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचा विमा काढणे अत्यावश्यक असून, त्यांच्या परिक्षेच्या अर्जासह विम्याची पावती जोडावी, असा एक अत्यंत चांगला निर्णयही या सिनेट सभेत घेण्यात आला. विद्यार्थ्यांचा विमा काढला नसल्यास त्या महाविद्यालयाचे परिक्षेचे अर्जच स्वीकारले जाणार नसल्याचे यावेळी ठरले. यासह अनेक महत्त्वपूर्ण मुद्दांवर या सिनेट सभेत सकारात्मक निर्णय झाले. प्रश्नोत्तराचा तासही गाजला. सभेला कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. सी. व्ही. भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.