झारखंडमध्ये भाजपासमोर बहुरंगी लढतींचे आव्हान

    दिनांक :16-Nov-2019
आदिवासींची सर्वाधिक संख्या
30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणूक
 
रांची, 
81 सदस्यांच्या झारखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 65 जागा जिंकल्याचे लक्ष्य समोर ठेवले असले, तरी या पक्षाला बहुरंगी लढतींचा मुकाबला करावा लागत आहे. भाजपाला सत्ता टिकवण्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत द्यायची असून, आता एकाच वेळी अनेकांशी दोन हात करावे लागणार आहेत. अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेशी (एजेएसयू) पक्षाचे मतभेद झालेले असून, ते दूर करण्यात अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच एनडीएचे सहकारी पक्ष जदयु आणि लोजपा हे स्वबळावर लढत आहेत. ‘महागठबंधन’चे आव्हान वेगळेच आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होत असून 30 नोव्हेंबरपासून मतदानास सुरुवात होईल. त्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे.
 
 
 
लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वबळावर 50 जागा लढवण्याची घोषणा नुकतीच केल्याने भाजपाला धक्का बसला आहे. या निवडणुकीत युती करण्यासाठी आम्ही विचारले असता, भाजपाकडून काहीच उत्तर आले नव्हते. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. जदयुने सर्वप्रथम स्वबळावर लढण्याची घोषणा करून भाजपाला आव्हान दिले. भाजपाने आपल्या सहकारी पक्षांमधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात विरोधकांनी कोणताही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आणि याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या राज्यात भाजपाला बेरोजगारी, शेती व आर्थिक आघाडीवरील समस्या यासारख्या मुद्यांचा सामना करावा लागणार आहे. राज्यात सरकारविरोधी जनमत नाहीच. विरोधकांची अनेक शकले पडली आहे, असे भाजपाच्या एका नेत्याने सांगितले.
महाराष्ट्रात भाजपा व शिवसेना यांची 30 वर्षांची युती तुटल्याचा काही परिणाम झारखंडमध्ये होईल का, असे विचारले असता एका नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रासारखी स्थिती येथे येऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. बंडखोरांनी भाजपाची मते कमी करू नयेत, यासाठीही खबरदारी घेतली जात आहे. लोजपा व जदयु येथे स्वबळावर लढले तरी पक्षाला चिंता नाही, कारण केंद्रात हे दोन्ही पक्ष एनडीएमध्ये आहेत. मागील निवडणुकीत भाजपाने 37 जागा, तर एजेएसयूने 5 जागा जिंकल्या होत्या. माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा पक्ष स्वबळावर लढत आहे.