ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात माहुताचा मृत्यू!

    दिनांक :16-Nov-2019
चंद्रपूर, 
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीच्या कामासाठी असलेला ‘गजराज’ नावाचा हत्ती शनिवारी सायंकाळी अचानक माजला आणि त्याने सहकारी माहुत जानिक मसराम यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जानिकचा मृत्यू झाला आहे. या घटनेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांनी दुजोरा दिला आहे. 

 
 
‘गजराज’ अचानक मस्तीत आलेल्या त्याने चारा कापणी करणार्‍या जानिक मसराम यांच्यावर हल्ला चढवला. एक नव्हे, तर दोनदा या हत्तीने जानिकला जमिनीवर आपटले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे ताडोबातील वनाधिकार्‍यांनी सांगितले. ही घटना आज शनिवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास मोहुर्ली येथे घडली.
 
सुप्रसिद्व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन मादी, तर एक नर हत्ती आहे. मागील काही दिवसांत या हत्तीवरून सफारी केली जायची. सद्यस्थितीत एका मादी हत्तीला एक वर्षाचे पिल्लू असून, दुसरी मादी हत्ती गरोदर आहे. या काळात मादी हत्ती ही नर हत्तीला जवळ येऊ देत नाही. त्यामुळे गजराज नावाचा नर हत्ती बिथरला असावा, असे मत व्यक्त केेले जात आहे. 
 
शनिवारी चारा कापणीची कायमस्वरूपी नोकरी करणारा जानिक मसराम हा हत्तीला चारा टाकण्यासाठी गेला असता, रागात असलेल्या हत्तीने जानिकला सोंडाने उचलले आणि एक नव्हे, तर दोनदा जमिनीवर आपटले. त्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला. याबाबतची माहिती वनाधिकार्‍यांना देण्यात आली. लागलीच वरिष्ठ वनाधिकारी घटनास्थळी रवाना झालेत. दूरवरून घटनास्थळाची पाहणी वनाधिकार्‍यांनी केली. बिथरलेला हत्ती सायंकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही जवळ येऊ देत नव्हता, असे वनाधिकार्‍यांनी सांगितले. 
 
१३ जणांचा बळी घेणार्‍या वाघिणीला जेरबंद करण्याच्या कामासाठी या गजराजला ताडोबा येथून पांढरकवड्याला नेले असता, तेथेेही त्याने एका महिलेवर हल्ला करून तिला ठार केले असल्याचे कळते.