गांधी परिवाराच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे लवकरच समोर येतील

    दिनांक :16-Nov-2019
नवी दिल्ली,
गांधी परिवाराच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे येत्या काळात पुढे आलेली दिसतील, असे ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. राजकारणाच्या बुरख्याआड काँग्रेसमध्ये व्यापार आणि परिवार सोबतसोबत चालतो, असा आरोप त्यांनी केला. 
 
 
 
यंग इंडियन ही गैर लाभकारी संस्था असल्याचा गांधी परिवाराचा दावा कर प्राधिकरणाने फेटाळून लावला, तसेच 100 कोटी रुपये आयकर तातडीने भरण्याचे निर्देश दिले. भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत रविशंकरप्रसाद यांनी आज गांधी परिवारावर घणाघाती हल्ला चढवला. आपल्या संपत्तीचा तपशील गांधी परिवाराने लपवला, असा आरोप करत प्रसाद म्हणाले की, हे ‘फॅमिली मॉडेल ऑफ करप्शन’ आहे.
 
 
2008 मध्ये बंद पडलेल्या नॅशनल हेराल्ड दैनिकाचे प्रकाशन करणार्‍या असोसिएट जर्नलला गांधी परिवाराने यंग इंडियन कंपनीच्या माध्यमातून 90 कोटींचे कर्ज देत, त्याची 2 हजार कोटींची संपत्ती आपल्या ताब्यात घेतली, असा आरोप करत प्रसाद म्हणाले की, यंग इंडिया कंपनीचे 70 टक्के शेयर सोनिया गांधी तसेच राहुल गांधींच्या मालकीचे आहेत. उर्वरित शेयर सुमन दुबे तसेच सॅम पित्रोदा यांच्याकडे आहेत.
 
 
देशातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम तसेच धर्मनिरपेक्षता जागवण्याचे काम आपण करणार असल्यामुळे आपल्याला करमाफी देण्यात यावी, अशी मागणी यंग इंडियनतर्फे संपुआच्या तत्कालिन सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यत यंग इंडियनला कर्जमाफी देण्यात आली. मात्र, तुम्ही सरकारला वचन दिल्याप्रमाणे आतापर्यत काय काम केले, हे यंग इंडियनला सांगता आले नाही, त्यामुळे कर प्राधिकरणाने त्यांची करमाफीची मागणी फेटाळली, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
 
 
मी जे काही सांगत आहे, ते माझ्या मनाचे नाही, तर कर प्राधिकरणाने म्हटले आहे, गांधी परिवाराकडे कंट्रोलिंग शेयर आहेत, असे कर प्राधिकरणाने म्हटले आहे, याकडे लक्ष वेधत प्रसाद म्हणाले की, कंट्रोलिंग शेयरचा अर्थ काय आहे. दिल्ली, चंदीगड आणि मोहाली येथे गांधी परिवाराची जमीन व दोन हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2010 मध्ये धर्मादाय न्यास म्हणून काँग्रेस पक्षाने अर्ज केलाण त्यावेळी आपल्याकडे 2 हजार कोटींची संपत्ती आहे, जी फक्त 50 लाख रुपयांना आपल्याला मिळाली, असे सांगितले नाही. अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचा भाजपा तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले.
 
 
आपल्या जवळच्या संपत्तीची तसेच आपल्या सर्व व्यवहारांची माहिती गांधी परिवाराने देशवासीयांपासून लपवली, असा आरोप सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचे नाव न घेता प्रसाद यांनी केला. तुम्ही खोटेच बोलले नाही, तर वस्तुस्थिती दडवली, असे कर प्राधिकरणाने म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 
 
नॅशनल हेराल्डला दिल्लीत जी जमीन मिळाली, ती वर्तमानपत्र चालवण्यासाठी देण्यात आली होती, मात्र त्यावा व्यावसायिक वापर करून लाखो रुपये कमावण्यात आले, असा आरोप प्रसाद यांनी केला.