संस्कृत प्राध्यापकपदी मुस्लिम व्यक्तीची नेमणूक

    दिनांक :16-Nov-2019
अभाविपचा विरोध, बनारस हिंदू विद्यापीठाचे स्पष्टीकरण
 
वाराणसी,
बनारस हिंदू विद्यापीठाच्या संस्कृत विभागात सहायक प्राध्यापकपदी मुस्लिम व्यक्तीची नेमणूक करण्यात आली असून या निर्णयाचे प्रशासनाने शुक्रवारी समर्थन केले. धर्म, जात, समुदाय व लिंगभेद न करता सर्वाना समान संधी देण्याचे आमचे धोरण आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने संस्कृत साहित्य विभागात सहायक प्राध्यापकपदी फिरोझ खान यांच्या नेमणुकीस विरोध केला होता. त्यावर विद्यापीठाने शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
 
 
बनारस हिंदू विद्यापीठाने म्हटले आहे,की संबंधित व्यक्तीची निवड ही एका समितीने एकमताने केलेली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे त्यात पालन करण्यात आले आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदी कुलगुरू राकेश भटनागर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक 5 नोव्हेंबरला झाली होती, त्यात फिरोझ खान यांच्या नेमणुकीची शिफारस करण्यात आली होती. खान यांची नियुक्ती संस्कृत साहित्य विभागात केल्याने काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. कुलगुरू व इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुरुवारी निदर्शकांच्या प्रतिनिधींशी दोन तास चर्चा केली.
शैक्षणिक व अध्यापन पातळीवर जात, धर्म, लिंगभेद न करता सर्वांनाच समान संधी देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे, असे स्पष्टीकरण कुलगुरू भटनागर यांनी दिले. बनारस हिंदू विद्यापीठ कायद्याचे तंतोतंत पालन आम्ही केले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर घटनात्मक व कायदेशीर मत मागवले जाईल, असेही कुलगुरू भटनागर यांनी स्पष्ट केले.