संसदेत आता शिवसेना विरोधी बाकावर बसणार

    दिनांक :16-Nov-2019

नवी दिल्ली,
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले असताना, त्याचे प्रतिबिंब संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटण्याची चिन्हे आहेत. आतापर्यत रालोआचा घटकपक्ष म्हणून सत्ताधारी बाजूला बसणार्‍या शिवसेनेला आता संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर बसावे लागणार असल्याचे समजते. 
 
 
 
राज्यसभेतील शिवसेनेचे सदस्य संजय राऊत आणि अनिल देसाई यांना सोमवारपासून सुरू होणार्‍या अधिवेशनात राज्यसभा सचिवालयाने विरोधी बाकांवर जागा दिली असल्याचे समजते. लोकसभेतील शिवसेनेच्या 18 खासदारांवरही हीच वेळ आली आहे.
 
 
महाराष्ट्रात शिवसेना भाजपाला बजूला सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरिंवद सावंत यांनी पक्षाच्या निर्देशानुसार मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. आपण रालोआतून बाहेर पडल्याची औपचारिक घोषणा शिवसेनेने अद्याप केली नाही, तसेच शिवसेनेला रालोआतून बाहेर काढल्याचे भाजपानेही जाहीर केले नाही. मात्र, शिवसेना आता रालोतात नाही, असे मानले जात आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उद्या होणार्‍या रालोआच्या बैठकीचे अधिकृत निमंत्रण यावेळी शिवसेनेला पाठवण्यात आले नाही.
 
 
उद्या दिल्लीत होणार्‍या रालोआच्या बैठकीत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
 
  
विनायक राऊतांकडून निषेध
 
शिवसेनेच्या खासदारांच्या राज्यसभेतील जागा बदलण्यात आल्याचा शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी तीव्र निषेध केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकारातून रालोआची निर्मिती झाली, पण निर्मात्या शिवसेनेलाच रालोआतून बाहेर काढले जाते, असा आरोप राऊत यांनी केला. शिवसेनला संपवण्याचा हा भाजपाचा प्रयत्न आहे, पण शिवसेना संपणार नाही, भाजपाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागील, असे राऊत यांनी म्हटले आहे.