बिल गेट्स यांच्या हस्ते होणार डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचा गौरव

    दिनांक :16-Nov-2019
नवी दिल्ली, 
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना लाईफटाईम अचिव्हमेंट मेडलने गौरवण्यात येणार आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव केला जाणार आहे. रविवार दि. १७ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत हा कार्यक्रम पार पडेल.

 
 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात येणार आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉल येथे हा सोहळा पार पडणार आहे.
यापूर्वी आमटे दाम्पत्याला मॅगेसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. गडचिरोलीतील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून ते आरोग्य सेवा देत आहेत. तसंच डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीनं गौरवान्वित केले होते. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या दुर्गम भागात जाऊन आदिवासी जनतेची ते सेवा करत आहेत. तसंच दुर्लक्षित घटकांना वैद्यकीय सुविधा देऊन आरोग्य विषयक विकास साधने, शिक्षण प्राणी, अनाथालय आदी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केले आहे.