श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स पुन्हा नंबर वन

    दिनांक :16-Nov-2019
नवी दिल्ली,
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पुन्हा एकदा पहिलं स्थान पटकावलं आहे. गेट्स यांनी ई-कॉमर्स क्षेत्रातील महाकाय कंपनी असलेल्या 'अॅमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजॉस यांना मागे टाकलं आहे. 'क्लाइड कम्प्युटिंग' संदर्भातील १० अब्ज डॉलरचं कंत्राट मिळवण्यात मायक्रोसॉफ्टला यश आल्यानंतर ही उलथापालथ झाली आहे.

 
'पेंटागन'कडून 'क्लाउड कम्प्युटिंग'चं कंत्राट मिळवण्यासाठी अॅमेझॉन व मायक्रोसॉफ्टमध्ये चुरस होती. मायक्रोसॉफ्टनं यात बाजी मारली. २५ ऑक्टोबर रोजी 'पेंटागन' याबाबतच्या निर्णयाची घोषणा केली. या घोषणेनंतर मायक्रोसॉफ्टचे समभाग चार टक्क्यांनी वधारले. त्याचा थेट परिणाम बिल गेट्स यांच्या संपत्तीवर झाला. गेट्स यांची एकूण संपत्ती आता अंदाजे ७८०० अब्जांवर गेली आहे. दुसरीकडे, पेंटागनचं कंत्राट न मिळाल्यामुळं अॅमेझॉनचे समभाग दोन टक्क्यांनी कोसळले. त्याचा परिणाम बेजॉस यांच्या संपत्तीवर झाला. त्यांची संपत्ती सध्या अंदाजे ७६६८ अब्ज आहे.
गेल्या महिन्यात देखील गेट्स यांनी बेजॉस यांना संपत्तीच्या बाबतीत मागे टाकले होते. मात्र, अॅमेझॉनचे शेअर वधारल्यामुळं बेजॉस पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आले होते.
बर्नाड अर्नाल्ट तिसऱ्या क्रमांकावर
'ब्लूमबर्ग बिलिनिअर्स इंडेक्स' ही संस्था जगातील ५०० श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर सातत्यानं नजर ठेवून असते. अमेरिकी शेअर बाजार बंद झाल्यानंतर संपत्तीचे आकडे अद्ययावत केले जातात. ताज्या आकडेवारीनुसार, सर्वात श्रीमंतांच्या यादीत युरोपमधील उद्योजक बर्नाड अर्नाल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ७२४२ अब्ज इतकी आहे.