गोव्याच्या पोलिस महासंचालकांचे हृदयविकाराने निधन

    दिनांक :16-Nov-2019
पणजी, 
कर्तबगार आयपीएस अधिकारी आणि गोव्याचे पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता नवी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. नंदा हे कार्यालयीन कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या हृदयात कळा येऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
 
 
 
नंदा यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांना देण्यात आल्याचे पणजी पोलिसांकडून सांगण्यात आले. नंदा हे 1988 च्या तुकडीचे अॅगमुट कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. गोव्याचे पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून त्यांना अद्याप वर्षही पूर्ण झाले नव्हते. प्रणब नंदा यांच्या पत्नी सुंदरी नंदा याही आयपीएस अधिकारी असून, पोलिस महानिरीक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी गोव्यातही काम केले आहे. नंदा यांच्या आकस्मिक निधनामुळे धक्का बसल्याचे गोव्याचे पोलिस महानिरीक्षक जसपालिंसग यांनी म्हटले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही नंदा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.