नैवेद्याच्या ताटात मीठ का वाढू नये?

    दिनांक :16-Nov-2019
|
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. मीठ हे ‘मी’पणाचे, अहंकाराचे नुसते प्रतीकच नाही तर आयुर्वेदिक गुणधर्माच्या दृष्टीनेदेखील खोलातून विचार झाल्यास आणि त्यावर संशोधन केल्यास अहंकाराचे मूळ त्यात आहे. निदान तो अहंकार भगवंतापुढे मांडू नये हा विचार त्यात आहे.
याचा अर्थ रोजच्या आहारात मीठ कमी करायचे असा नाही. शिजवलेल्या अन्नात योग्य प्रमाणातले मीठ आवश्यक आहे आणि ते नैवेद्याच्या पदार्थात असतेच, फक्त वरून मीठ न शिजवता खाऊ नये, असे आयुर्वेददेखील सांगते. मग एखाद्या पदार्थाला मीठच टाकले गेले नसल्यास शक्य असेल तर मीठ टाकून शिजवून घ्या. जे पातळ, पाणी असलेल्या गोष्टींसाठी शक्य आहे; पण खिचडी, पोहे, फळभाजी यामध्ये शक्य नसते, मग असे पदार्थ लोणच्याबरोबर खावेत किंवा बेचव खाण्याची सवय लावावी. शेवटी जिभेचे चोचले कमी करणे हाही एक अभ्यासच आहे.
 

 
 
नर्मदेची प्रदक्षिणा त्या काळी करण्यामागे चतुष्ट्याचा विचार होता. अंतःकरण चतुष्ट्य (मन, बुद्धी, चित्त, अहंकार), पुरुषार्थ चतुष्ट्य (धर्म, अर्थ, काम, मोक्ष), अवस्था चतुष्ट्य (जागृती, स्वप्न, सुषुप्ती, उन्मनी-तुरिया), साधन चतुष्ट्य (संतोष, शील, नैतिकता आणि जागृत महापुरुष), साधन-चतुष्ट्य (विवेक, वैराग्य, शमदमादि षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व).
गीतेत भगवान म्हणतात की असे आत्मस्थित महापुरुष वेद, यज्ञ, दान आणि तप या चतुर्विध कर्मफलांवर अतिक्रमण करतात. अर्थात ते वेदांना, वेदार्थांना, वेदाच्या गर्भित अर्थाला केव्हाच मागे सोडतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की,
न वेदयज्ञाध्ययनैर न दानैर न च क्रियाभिर न तपोभिरुग्रै:
अर्थात मला वेदाने, यज्ञाने, अध्ययनाने, दानाने, क्रियेने, उग्र तपाने जाणून घेऊ शकत नाही. या सर्वांनी जे दर्शन घडते असे वेद-उपनिषद-पुराणादी मध्ये जे सांगितले आहे त्यापेक्षा मी वेगळा आहे.
नाहं वेदैर न तपसा न दानेन न चेज्यया
शक्य एवंविध दृष्टुं दृष्टवान असि मां यथा
(श्रीमद् भगवदगीता)
अर्थात अर्जुना माझे जे स्वरूप तू बघितले आहेस ते न वेदाने, न उग्र तपाने, न दानाने आणि न यज्ञाने, प्राप्त होणारे आहे. तर,
भक्त्‌या तव अनन्यया शक्य अहम एवंविधऽअर्जुन
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन परवेष्टुं च परंतप
केवळ अनन्य भक्तिद्वारा मला बघितले जाऊ शकते, जसे तू बघितले आहेस. स्पर्श करण्यासाठी आणि प्रवेश करण्यासाठीदेखील मी सुलभ आहे. भगवतगीतेमध्ये ज्ञान, कर्म, भक्ती, योग सांगितले आहे; पण गीतेने या सर्वांच्या एकत्रित िंचतनाचे विवेकतत्त्वही मांडले आहे. हे विवेकतत्त्व व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनाचा आत्मा आहे. स्वत:चे श्रेय गाठणार्‍या मनुष्यास आपल्या मनोवृत्तीचे परीक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी विवेकाची आणि संयमाची आवश्यकता आहे. संस्कारानुरूप आपल्या इच्छा धावत असतात. इच्छेप्रमाणे चित्तात तरंग चालत असतात. साधक-भक्ताने जुन्या अनिष्ट संस्कारांचा त्याग करून नवे इष्ट संस्कार धारण केले पाहिजेत. त्यासाठी विवेकाची दृष्टी हवी. काम, क्रोध, लोभ, अहंकार यांची शुद्ध-अशुद्ध रूपे ओळखता आली पाहिजेत. आणि अहंकार म्हणजे मीठ, मीपणा. म्हणून तो नैवेद्याच्या ताटात नको.