शरद पवार-सोनिया गांधी यांची भेट रद्द, सत्ताकोंडी लांबणार?

    दिनांक :16-Nov-2019
मुंबई,
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत होणारी भेट रद्द झाली आहे. या दोन्ही नेत्यांची रविवारी भेट होणार होती. पण, भेट रद्द होण्यामागील कारण समोर आलेले नाही. राज्यातील सत्ताकोंडीच्या पृष्ठभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व होते. पण, ही भेट रद्द झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 

 
 
 
काँग्रेस, राकाँ आणि शिवसेना या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एका बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा अहवाल तयार केला. हा अहवाल आता पक्षाच्या प्रमुखांना देण्यात आला आहे. प्रमुख नेत्यांनी यावर अंतिम निर्णय घेतल्यावरच पुढील निर्णय समोर येणार आहे. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांची भेट महत्त्वाची मानली जात होती.  पण ही भेट रद्द झाल्यामुळे राज्यातील सत्ताकोंडी आणखी लांबणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही सुरुवात होत आहे. त्यामुळे दिल्लीत राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष लागले आहे.
 
 
तत्पूर्वी सकाळी आलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही नेत्यांची रविवारी दुपारी चार वाजता दोन्ही नेत्यांची भेट होणार होती. तिन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. याचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठविण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला.
राज्यातील अवकाळी स्थितीवर या दोघांमध्ये चर्चा होणार होती, असे समजते.