एक धडा पत्रकारितेसाठीही...!

    दिनांक :16-Nov-2019
चौफेर 
सुनील कुहीकर  
 
बर्‍याच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कुठलासा एक कार्यक्रम सुरू होता. पत्रकारदिनाचाच असावा बहुधा. मंचावर एक उच्च पदस्थ पोलिस अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पत्रकारच आयोजक असल्याने मंचासमोरील खुर्च्यांवरची गर्दीही दखलपात्र ठरावी अशीच होती. कार्यक्रमपत्रिकेतील क्रमानुसार पाहुण्यांचे भाषण सुरू झाले. आजच्या पत्रकारितेचे तंत्र कसे बिघडलेले आहे इथपासून, तर पीतपत्रकारितेच्या वाढलेल्या प्रादुर्भावापर्यंत सार्‍याच मुद्यांना स्पर्श करीत त्यांचे आसूड ओढणे चालले होते. खरं तर ते ज्या विभागाचे प्रतिनिधित्व करीत होते, त्या पोलिस विभागाच्या कार्यपद्धतीवर, तिथल्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीवर, खाबुगिरीवर कुणी प्रश्न उपस्थित केलेत, तर उत्तरं देता देता पुरेवाट झाली असती त्यांची. तोंड लपवायलाही जागा उरू नये, इतकी केविलवाणी अवस्था तर खुद्द त्यांच्या विभागाची होती. आजही आहे. तरीही पत्रकारितेवर वार करणे सुरू होते. शहाणपणाचे धडे बिनधास्तपणे दिले जात होते. पण करता काय, ते ज्या क्षेत्रावर बेमुर्वतखोरपणे आसूड ओढत होते, त्यांचेतरी वागणे कुठे आक्षेप झुगारण्याच्या लायकीचे होते? खरंच, भारतीय पत्रकारिता दिवसागणिक दर्जाहीन होत चालली आहे? त्याची पातळी इतकी खालावत चालली आहे? त्या क्षेत्रात काम करणारी माणसं बेताल वागत स्वत:चा अजेंडा राबवू लागली आहेत? दुर्दैवाने, सकृद्दर्शनी तरी यातील कुठल्याच प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आढळत नाही! 
 
 
 
महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमांपासून तर दूरचित्रवाहिन्यांपर्यंत सर्वदूर अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली जो धिंगाणा चाललाय्‌, लोकांपर्यंत सर्वात पहिले ‘ब्रेकिंग न्यूज’ पोहोचविण्याच्या धडपडीत, पत्रकारितेच्या आचारसंहितेचे खोबरे करण्याची जी अहमहमिका त्या क्षेत्रातील लोकांमध्ये लागली आहे, त्यातून जे बेताल अन्‌ अपरिपक्व वागणं चाललं आहे, ते अनाकलनीय आहे.
 
संजय राऊत नामक एका लोकप्रतिनिधीच्या, शिवसेनेचे प्रवक्ते असलेल्या, योगायोगाने तत्कालीन राजकीय परिस्थितीवरील सततच्या वक्तव्यांमुळे काहीशा अधिक प्रमाणात प्रसिद्धी पावलेल्या एका व्यक्तीच्या हृदयनलिकेत ब्लॉकेजेस आढळणे, ही खरंच राष्ट्रीय पातळीवरील ‘ब्रेकिंग न्यूज’ आहे? कुणी ठरवलं ही राष्ट्रीय पातळीवरची ‘हॉट न्यूज’ आहे म्हणून? पण, केली काही हुशार लोकांनी त्याची नॅशनल न्यूज. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घोषित करणे ही घटनात्मक, तांत्रिक अपरिहार्यता होती. ‘डेमॉक्रॅटिक मशिनरी’ अपयशी ठरल्यास राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते. त्यासाठी, निर्धारित कालावधीत सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या राजकीय नेत्यांना दोषी धरता येईलही, पण अशी राजवट लागू झाली म्हणजे जणू काय राज्यावर भलेमोठे संकट कोसळले असल्याचे आणि सरकार स्थापन करण्याचे सारेच मार्ग आता अवरुद्ध झाले असल्याचे चित्र निर्माण करून, राज्यपालांना व्हिलन सिद्ध करण्याचा आततायीपणा कोण कशासाठी करत होतं? अज्ञानाचे जाहीर प्रदर्शन मांडत स्वत:चे हसू करून घेण्याचा अन्‌ लोकांची दिशाभूल करण्याचा उपद्‌व्याप तर केवळ हास्यास्पद होता. यातून माध्यमजगताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची सलही कुणाच्या मनात असू नये, ही बाब अन्‌ जो तो इतरांना मागे टाकून पुढे पळण्यासाठी धडपडत असल्याची परिस्थिती विदारक आहे.
 
लोकांना सारेकाही वेळेवर देता यावे यासाठीचे माध्यमविश्वातील मंडळींचे प्रयत्न अनावश्यक ठरवण्याचे कारण नाही. कित्येकदा तर मृत्युशय्येवरील व्यक्तीचा मृत्युलेख संबंधिताच्या मृत्यूपूर्वीच लिहून ठेवण्याच्या व्यवहारी अपरिहार्यतेलाही सामोरे जावे लागते, या क्षेत्रातील मंडळीला नाईलाजाने. पण, ही अपरिहार्यता वेगळी आणि उतावीळपणा वेगळा. सध्यातर, धसमुसळेपणाचा कळस गाठण्याचीच शर्यत लागलेली दिसतेय्‌ सर्वदूर. राज्याच्या राजकीय अस्थिरतेच्या मुद्यांवरून चाललेल्या दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान, एखाद्या अँकरची हातवारे करून, मोठमोठ्याने ओरडून प्रश्न विचारण्याची तर्‍हा, ‘त्याला हवे ते’ उत्तर समोरच्या व्यक्तीकडून मिळवण्यासाठीचा त्याचा अट्टाहास चीड आणणारा. समोरच्याला जाब विचारल्याच्या आविर्भावात प्रश्न विचारणं, आपल्याला पाहिजे ते गवसलं नाही की अस्वस्थ होणं... सारंच अजब, अतर्क्य आहे.
  
दोन दिवसांपूर्वी, पत्रकारांचा ससेमिरा टाळण्यासाठी अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेला... बैठक रद्द झाल्याने बारामतीला जात असल्याचे सांगत नंतर मुंबईतच एका हॉटेलमध्ये गुप्तपणे एकमेकांना भेटण्याचा प्रकार, हा कशाचा परिपाक मानायचा? इतकी लाजिरवाणी परिस्थिती कुणी निर्माण केली? असं करून, वर पुन्हा तुम्हाला टाळण्यासाठीच आम्ही हे केलं, असं निलाजरेपणानं सांगितलं या नेत्यांनी तर त्याचीही बातमी झाली! शरद पवारांच्या मुंबईतल्या घरातून बाहेर पडले अजित पवार तावातावाने, तर लागलीच अकलेचे तारे तोडायला सुरुवात व्हावी? सुतावरून स्वर्ग गाठण्याची कसरत सुरू व्हावी? संजय राऊत दवाखान्यातून अग्रलेख लिहीत असल्याचे छायाचित्र प्रसृत करताना, आदल्या दिवशी ॲन्जीओप्लॅस्टी झालेल्या रुग्णाला, लागलीच दुसर्‍या दिवशी असे करणे तब्येतीच्या दृष्टीने खरेच शक्य आहे का, असा प्रश्नही डोक्यात येऊ नये कुणाच्याच? दवाखान्यातच त्यांची मुलाखत घेण्यासाठी दाराशी ताटकळत बसलेल्या पत्रकारांशी बोलायला ॲन्जीओप्लॅस्टीनंतरच्या दोन दिवसांत परवानगी मिळू शकते? तेही लीलावतीसारख्या रुग्णालयात? पण, बातमीदारीत गुरफटलेल्यांपैकी कुणालाही हा प्रश्न पडत नाही. बातमी दाखवणार्‍यांनाही या प्रकरणी खोलात शिरण्याची गरज वाटत नाही. कशी वाटणार? त्यांना तर कुठलीही गोष्ट ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली खपवण्याची सवय झाली आहे. त्यांच्या लेखी तर चाणक्यही खूप स्वस्त झालाय्‌ आता, कुणालाही त्यांच्या रांगेत नेऊन बसवायला.
 
या घिसाडघाईत, काही कथित ज्येष्ठ पत्रकारांनी स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकून घेतल्या या काळात. काहींनी राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होणार नाही असे गृहीत धरून, तर काहींनी तशी इच्छा मनात बाळगून राजकीय विश्लेषणं आरंभली. भाजपा नेत्यांनी सरकार स्थापन करण्यास राज्यपालांकडे असमर्थता व्यक्त करताच त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. काहींनी तर, भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी आता शरद पवारांना कशी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल, याबाबतचे सल्लेही देऊन टाकले. महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून संख्याबळ लाभलेल्या एका राजकीय पक्षाला सत्तेबाहेर ठेवणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे? त्यांचे काम आहे हे? हे असले, कुणाची तरी सुपारी घेऊन वागणे कशासाठी आहे मग? 105 सदस्यसंख्या हे जनतेने नाकारल्याचे प्रमाणपत्र असेल, तर मग कॉंग्रेसच्या पदरात पडलेली 44ची संख्या हा काय सरकार स्थापण्यासाठीचा जनादेश आहे? यातील कशाचेच, कुणालाच सोयरसुतक नसल्यागत बेताल वागणे, बरळणे सुरू असल्याचे दृश्य दुर्दैवी ठरते.
 
अजित पवारांनी पत्रकारांना टाळण्यासाठी खेळलेला डाव राजकीय इतिहासात नवा नाही. पण, नंतर ज्या छद्मीपणे त्यांच्यावतीने या खेळाचे रहस्योद्घाटन करण्यात आले, त्यातून पत्रकारांना कसे उल्लू बनवले, हे बिनदिक्कतपणे सांगण्याचा प्रयत्न झाला, मुलाखतीत एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, तर हे मी तुम्हाला का म्हणून सांगू, असं पृथ्वीराज चव्हाणांनी बोलणं, यात ‘त्यांची’ मुजोरी तर आहेच, पण माध्यमकर्मींची टोकाची लाचारीही त्या मुजोरीला तितकीच कारणीभूत आहे. संपूर्ण राज्यात एक आमदार कसाबसा निवडून येऊ शकला, त्या मनसेनेत्याचे माजोरे बोल, ज्या दिवशी ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून खपवणेे बंद होईल, त्या दिवशी तेही जागेवर येतील. पण इथे प्रत्येकाचाच अजेंडा वेगळा. जीवघेण्या स्पर्धेचे निमित्त पुढे करून सारेच नीतिमत्तेचा बाजार मांडून बसलेले.
 
एका पोलिस अधिकार्‍याला स्वत:च्या विभागातला गोरखधंदा विसरून पत्रकारितेवर बोट ठेवण्याचे धाडस होते ते यामुळे. मुलाखत घेणार्‍या एखाद्या पत्रकाराच्या इभ्रतीचे कॅमेर्‍यासमोर वाटोळे करण्याची एखाद्या राजकीय नेत्याची मुजोरी हा त्याचाच परिणाम असतो. अलीकडे समाजमाध्यमं अधिक प्रभावी ठरताहेत. सामान्य माणसाच्या भावना तिथं निर्भीडपणे व्यक्त होताहेत. सर्वच बाबतीत बिनधास्तपणे व्यक्त होण्याच्या त्याच्या शैलीतून माध्यमंही सुटलेली नाहीत. अशा स्थितीत, अजित पवारांनी केलेल्या फजितीपेक्षाही सामान्य माणसाच्या नजरेतून उतरणे अधिक घातक अन्‌ नुकसानकारक ठरणार आहे...
 
9881717833