वैचारिक अगतिकता

    दिनांक :17-Nov-2019
मंथन
भाऊ तोरसेकर
 
विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे जे विचित्र वळण घेतले आहे, त्यामुळे विविध राजकीय पक्षांची सत्तालालसा चव्हाट्यावर आलेलीच आहे. पण त्याहीपेक्षा आपला बुद्धिवादी वा वैचारिक टेंभा मिरवणार्‍यांची लज्जास्पद अवस्था करून टाकली आहे. आधी सरसकट पुरोगामित्व म्हणून हिंदुत्ववादी संघटना संस्थांची टिंगल वा हेटाळणी करण्याचा सुलभ मार्ग त्यांना उपलब्ध होता. कारण, हिंदुत्व आणि पुरोगामी अशा दोन गटात राजकारण विभागले गेले होते. पण निकालानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून हट्ट धरला आणि त्यातून पेचप्रसंग निर्माण झाल्यामुळे सगळा संघर्षच मुळात दोन हिंदुत्ववादी पक्षात विभागला गेला. त्यात कोणीच तथाकथित पुरोगामी नसल्याने कुठल्या बाजूने टाळ्या पिटायच्या आणि कुणाची हेटाळणी करायची, असा पेचप्रसंग पुरोगामी बुद्धिमंतांसाठी यक्षप्रश्न म्हणून समोर आला.
 
 
अर्थात या लोकांना शिवसेना वा भाजपा यापैकी कोणाही विषयी आस्था वा प्रेम नाही. पण जो काही राजकीय व्यवहार चालू आहे, त्यात आपलेही काही मत आहे, हे दाखवणे किंवा व्यक्त करण्याची खाज शमत नाही. त्यामुळे गप्प बसले तर आपली ओळखही लोक विसरून जातील, याची चिंता आहे. म्हणून मग दोन हिंदुत्ववादी पक्षापैकी एकाची बाजू हमरीतुमरीवर येऊन मांडण्याची बौद्धिक कसरत अशा पुरोगामी शहाण्यांना करावी लागते आहे. जितका हा राजकीय पेच गुंतागुंतीचा होत चालला आहे, तितक्या या बौद्धिक कोलांटउड्या अधिकच मनोरंजक होत चालल्या आहेत. दोन दशकांपूर्वी युती सरकारच्या शिवशाहीचे वर्णन शिव्याशाही अशा शब्दात करणार्‍या निखिल वागळे यांना आज शिवसेनेचे सरकार सत्तेत बसण्याविषयी लागलेली उतावीळ बघितल्यावर, पुण्यतिथीदिनी बाळसाहेब ठाकरेंना मिळालेली सर्वात मोठी श्रद्धांजली म्हणायला हवी.
 
 
निखिल वागळे किंवा तत्सम पत्रकारितेचा उदयच मुळात शिवसेनेला विरोध करण्यासाठी होता. त्यामुळे त्या काळात किंवा आजही तत्सम पत्रकार बुद्धिमंतांनी शिवसेनेचे राजकारण, हिंदुत्व किंवा एकूण भूमिकांची यथेच्छ टवाळी करण्यात काहीही गैर नव्हते. हे लोक कधीही पत्रकार नव्हते. तर आपला लाडका राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठीच त्यांनी कधी पत्रकार वा बुद्धिजीवी अभ्यासक असे मुखवटे चढवलेले होते. त्यामुळे हातामध्ये आलेल्या साधनांचा उपयोग त्यांनी कुठल्याही हिंदू संघटना वा राजकीय पक्षांच्या विरोधात केल्यास नवल नाही. सहाजिकच शिवसेना व भाजपा यांची 1990 नंतरच्या काळात भक्कम युती झाल्यावर त्यांनी या युतीवर कडाडून हल्ला करणे योग्यच होते. त्यांच्या स्वभावधर्माला धरूनच होते.
 
 
म्हणूनच 1995 नंतर जेव्हा तीच युती राज्यात सत्तेवर येऊन बसली, तेव्हा युतीला पदोपदी टीकेचे, आरोपांचे लक्ष्य करण्यात अशा लोकांनी धन्यता मानलेली होती. मग अशा टीकेचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून घेतला जायचा. त्याची ठाकरी भाषा अशा पुरोगामी विचारवंत पत्रकारांसारखी तुपात घोळलेली नसल्याने गावठी शब्दात समाचार घेतला जायचा. त्यावर तशाच भाषेत उत्तर देणे जमत नसल्याने वागळे यांनी युतीच्या त्या सरकारचे शिव्याशाही असे बारसे केलेले होते. आता त्याला चोवीस वर्षांचा किंवा दोन तपांचा कालावधी उलटून गेला आहे. म्हणजेच दोन तपांची तपश्चर्या करूनही त्यांना आपले पुरोगामित्व अखेरीस पराभूत होताना बघावे लागलेले आहे. निदान महाराष्ट्रात त्याला दोन हिंदुत्ववादी पक्षांची युती कारण झाली आणि आता त्या युतीतच जुंपली म्हटल्यावर अशा निराश, वैफल्यग्रस्तांना आगीत तेल ओतण्याची अपूर्व संधी चालून आलेली आहे. पण त्यातली गंमत समजून घेतली पाहिजे. या दोन पक्षातही भाजपापेक्षा या लोकांनी शिवसेनेचा अधिक द्वेष केला होता. आज त्यांना त्याच सेनेचा पुळका आलेला आहे. बाळासाहेबांना, यापेक्षा मोठी कुठली श्रद्धांजली असू शकते ना? 

 
 
 
भाजपाला कमी जागा मिळाल्या, पण युती असताना सेनेच्या सोबत असलेल्या युतीला बहुमताचा कौल मतदाराने दिलेला आहे. त्यात आपल्यालाच मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे, म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हटून बसले आणि बहुमत मिळूनही युतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे युतीचा मतदार विचलीत झाला आहे. ती गोष्ट बाजूला ठेवू. कारण, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानुसार त्यांनी बाळासाहेबांना अखेरच्या क्षणी रुग्णशय्येवर असताना शब्द दिलेला होता, म्हणून सेनेचाच मुख्यमंत्री बनवणे हा त्यांचा हट्ट आहे. पित्याला दिलेला शब्द पाळण्याला हिंदू समाजात महत्त्व आहे. पण तो शब्द प्रत्यक्षात आणत असताना उद्धवजींनी केलेली राजकीय खेळी बाळासाहेबांना वेगळ्या कारणास्तव नक्कीच आवडली असती.
 
 
ज्यांनी शिवसेनेला शिव्याशाप देण्यासाठीच आयुष्य वाहून टाकलेले होते, सेनेला सत्ताभ्रष्ट करण्यासाठीच आपली सर्व बुद्धी पणाला लावलेली होती, तेच आज सेनेला सत्तेत आणण्यासाठी अधिक उतावळे झालेले बघून साहेबांचेही डोळे पाणावले असते ना? उद्धवजी यापेक्षा मोठी गोष्ट कुठली असू शकते? तिथे युतीपलीकडचे राजकीय समीकरण जुळवून दोन्ही काँग्रेस पक्षांना सोबत घेण्याचे डाव उद्धव खेळत आहेत आणि त्यांना त्यात कुठलीही घाई नाही. त्यांनी सोबत घेतलेले शरद पवारही म्हणतात, सरकार स्थापनेला वेळ लागला तरी हरकत नाही. पण सरकार टिकवायचे, तर स्थापनेला वेळ लागणारच. पण तितकाही संयम वागळे इत्यादीकांना उरलेला नाही. त्यांनी आता काँग्रेस व तिच्या नेत्यांना शिव्याशाप देण्यापर्यंत मजल मारली आहे. विनाविलंब काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देऊन सेनेचा मुख्यमंत्री सत्तेत आणून बसवायला हवा म्हणून ही मंडळी इतकी उतावळी झालेली आहेत की, साहेबांना शब्द कोणी दिला, असा प्रश्न खुद्द उद्धवजींनाच पडावा. विदूषकांना चाणक्य केले मग चंद्रगुप्तांना कसरतपटू होऊन सर्कस करावी लागतेच ना?
 
 
तर अशा पुरोगामी विचारवंत पत्रकार मंडळींची ही बौद्धिक कसरत बघून अनेकजण अचंबित झालेले आहेत. शिवसेनेला प्रतिगामी वा जातीयवादी म्हणून शिव्याशाप देण्यात हयात घालवलेल्यांचे आजचे बहुमोल मार्गदर्शन व विश्लेषण बघून त्यांचेच अनेक चहातेही बुचकळ्यात पडलेले आहेत. या मंडळींना शिवसेनेचा पुळका अकस्मात कसा आला? किंवा सेनेचा मुख्यमंत्री होण्याची यांना इतकी घाई कशाला, असा प्रश्नही अनेकांना सतावतो आहे. तर त्यात कुठलेही काही अतर्क्य घडलेले नाही. अशा बहुतांश शहाण्यांचे बालपण काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करायच्या शपथा घेण्यात खर्ची पडले. पण काँग्रेस नामशेष होत असताना तिची जागा घेण्याइतके बळ अंगी नसल्याने आघाड्या करून थकले आणि अखेरीस ती जागा भाजपा वा राज्यात शिवसेना घेताना दिसल्यावर, हेच लोक पुरोगामित्वाचा रंग काँग्रेसलाच लावून त्याच पक्षाचे मुके घेत पुढे सरकलेले आहेत. त्याचा अर्थ ते काँग्रेसचे विरोधक नव्हते की शिवसेना वा भाजपाचेही शत्रू नव्हते. त्यांची बुद्धी कशी चालते ते समजून घेतले पाहिजे.
 
 
त्या त्या प्रसंगी ही मंडळी कोणाचा अधिक द्वेष करतात, त्यानुसार त्यांची बुद्धी चालत असते. भाजपा, सेनेचा जोर नसताना ते काँग्रेसचा द्वेष करीत होते आणि जेव्हा सेना किंवा भाजपा जोरात आले, तेव्हा त्यांच्या हिंदुत्वाचा द्वेष करताना त्यांनी काँग्रेसला चुंबण्याची भूमिका घेतली. आता दोन्ही काँग्रेस पार दुबळ्या होऊन गेल्यात आणि दोन हिंदुत्ववादी पक्षात भाजपा शिरजोर आहे. तर त्याला आव्हान देणार्‍या शिवसेनेचा पुळका त्यांना आलेला आहे. ते सेनेविषयीचे प्रेम अजिबात नाही. त्यापेक्षा भाजपाचा द्वेष त्या सेनाप्रेमात सामावलेला आहे. यशस्वी असतील त्यांचा द्वेष करण्यावर ज्यांची बुद्धी विसंबली आहे, त्यांना हल्ली पुरोगामी बुद्धिमंत, अभ्यासक, पत्रकार समजले जाते. त्यामुळे सामान्य माणसाने त्यांना समजून घेतले पाहिजे. मग निखिल आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्याचा उतावळेपणा करतोय्‌, त्याचा उलगडा होऊ शकेल. पण कुठून का असेना बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वात मोठीच श्रद्धांजली मिळाली, हे नाकारता येणार नाही.