गोष्ट तान्हुल्याच्या आगमनाची...

    दिनांक :17-Nov-2019
पल्लवी पडोळे
 
दत्तक क्षेत्रात कितीही आमूलाग्र बदल झालेला असला तरी अजूनही दत्तकाबाबत मुलांना सांगण्याचा पालकांचा कल कमीच आहे. आजही मुलांना दत्तकाबाबत सांगण्यास पालक टाळाटाळ करतात. न सांगण्याचे दुष्परिणाम पालकांपर्यंत पोहचवावे, हाच या लेखनामागील मुख्य उद्देश.
 
 
संपूर्ण दत्तकविधानाच्या प्रक्रियेत मुलांना दत्तकाबाबत सांगणे ही सगळ्यात नाजुकबाब आहे. आजही 40 टक्क्यांपेक्षाही कमी पालक हे सत्य मुलांना सहजगतीने सांगतात. पालकांना आपलं मुलं नेहमीच लहान वाटत असतं. आज सांगू, उद्या सांगू करत करत मुलं मोठी होतात आणि मग सांगण्याचं धाडसच होत नाही. काही पालक याबाबतची चर्चा मुलांसोबत सुरू करतात, पण ती पुढेच जात नाही. काही पालक सांगायचं म्हणून सांगतात, पण मुलांना सत्य समजू नये, हीच त्यांची इच्छा असते. दत्तकाबाबत लहानपणी सांगितले तर काही वर्षांनी त्याला ते कळले का? ही सत्यता पडताळून पहाणे अतिशय गरजेचं असतं. प्रत्येक टप्प्यावर मुलांना कसं सांगायचं यासाठी स्वत:ची मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. 

 
 
मुलांना दत्तकाबाबत स्वत: सांगावे. त्यांना शाळेतून, नातेवाईकांकडून कळले की ते दु:खी होतात, त्यांना धक्का बसतो व त्याचा परिणाम त्यांच्या वर्तवणुकीवर होतो. योग्यवेळी पालकांकडून दत्तकाविषयी मुलांना न समजल्यास समस्या उद्भवू शकतात. दोघे एकमेकांवर कितीही प्रेम करत असतील तरी ‘दत्तक घेतलं’ हे सत्य प्रथम पालकांकडूनच मुलांना समाजायला हवं. इतरांकडून समजणे म्हणजे बालक-पालक नात्याला तडा जाणे आहे. दत्तकाबाबत त्यांना कधी, कसे व का ? सांगावे याबाबतचा निर्णय पालक जेव्हा व्यवस्थित घेतील तेवढा कुणीच घेऊ शकणार नाही. म्हणून पालकांकडून सत्य कळल्यास नातं अधिक घट्ट होईल. एकमेकांवरचा विश्वास वाढविण्यास अधिक मदत होईल. दत्तकाची संकल्पना पालकांनी स्वत: स्वीकारली तर त्यांना मुलांना सांगणे कठिण जाणार नाही. न सांगणे ही पळवाट आहे व ती चुकीची आहे, दत्तकाबाबत विनाठाई अहंकार मानणे चुकीचे आहे. तसेच न्यूनगंडही बाळगू नये.
 
 
ज्या विश्वासाने तुम्ही मुलाला दत्तक घेतले. त्याच विश्वासाने त्याला कुटुंबात व समाजात वाढवा तेव्हाच समाज तुम्हाला व मुलाला स्वीकारेल दत्तक मुलांना माझी आई कोण? ही पार्श्वभूमी जाणून घेणे त्यांची भावनिक गरज आहे. त्यामुळे मुलांनी हा प्रश्न विचारल्यास वाईट वाटून घेऊ नका िंकवा आपल्या पालकत्वावर शंका घेऊ नका. तुम्ही उत्तम पालक आहातचं! यात शंका नाही. त्याचवेळी भावनाप्रधान मुलगा असेल, तर त्याच्या मनात साधारण पौगांडावस्थेत माझी आई कोण? ती आता कशी असेल? तिने मला का सोडलं? ती काही हालअपेष्टेत तर नसेल ना? मला तिला कशी मदत करता येईल? असे एक ना अनेक विचार मुलांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. त्याचं समाधान करणे यातच खरी पालकांची कसरत आहे. यासाठी गरज पडल्यास पालकांनी संस्थेची मदत जरूर घ्यावी. संस्थेच्या सतत संपर्कात राहावे, गरज पडल्यास त्यांचा सल्ला घेत राहावा.
 
 
मित्रांनो, विवाहानंतर दोन तीन वर्षे परिटघडीचा संसार बरा वाटतो, मात्र काही दिवसातच एका चिमण्या जिवाची आवड पालकांना स्वस्थ बसू देत नाही. एक छोटसं, छानसं बाळ आपल्या घरात कधी येणार? याची वाट प्रत्येक जोडपं पहात असतं. आपल्याला बाळ होणार नाही, हे कटूसत्य स्वीकारण्याची िंहमत कुठल्याच जोडप्यात नसते. मात्र, हे कटूसत्य पालकांना स्वीकारावं लागतं व तेव्हापासून संसारातील हास्य हळूहळू कमी होत जातं. दोघांच्या संसारातील गाडीला वेग तिसर्‍याच्या आगमनाने येतो, हे सत्य दाम्पत्य हळूहळू स्वीकारू लागतात व मग मूलं होत नाही म्हणून आयुष्यभर दु:खी राहण्यापेक्षा एका निरागस बाळाला दत्तक घेऊन आपल्या मातृत्व-पितृत्वाची पूर्णता करण्याचा निर्णय घेतात. मोठ्यांचे सारे ताणतणाव नाहीसे करण्याचं सामर्थ्य या चिमण्या जिवात असतं. बाळाच्या प्रत्येक पावलाबरोबर त्यांच्या जीवनातले चढ-उतार आठवताना होणार्‍या आनंदाचे पोत काही वेगळेच असते. मुलं लहान असेपर्यंत साधारण 2 ते 3 वर्षेपर्यंत मुलांच्या बाललीला व लहान बाळ सांभाळताना येणार्‍या जबाबदार्‍या पूर्ण करतांना पालकांचा वेळ कसा निघून जातो समजतच नाही. मुले शाळेत जाणार, बाहेरच्या विश्वाशी आता त्याचा संपर्क येणार, या विचारांसोबत आपण मुलाला दत्तकाबाबत कसे सांगायचं, या विचारांचे काहूर पालकाच्या मनात सतत सुरू असतात. बरेचदा सांगूच नये,
 
 
ही तात्पुरती पळवाट पालक स्वीकारतात व आयुष्यभर सांगितले नाही, या दडपणाखाली वावरतात पण न सांगणे ही अतिशय िंचतेची बाब आहे. कारण, मुलांना कधी ना कधी इतरांकडून समजण्याची शक्यता असतेच व ती अतिशय धोक्याची असते. कारण, सांगणारा कसा सांगतो, कुठल्या उद्देशाने सांगतो यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. हे सत्य जर मुलांना पौगंडावस्थेत कळले तर ते अतिशय कठीण होऊन जातं. या वयात आधीच मुलांचे मन चलविचल झालेले असते. त्यांच्यातील ‘स्व’ जागृत झालेला असतो. त्यांच्याकडून पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी मुलांची धडपड सुरू असते आणि अशातच त्यांना दत्तकाचे इतरांकडून कळल्यास मुलं अस्वस्थ होतात. पहिले म्हणजे हे सत्य स्वीकारण्यासाठी त्यांचे मन धजत नाही. दुसरे म्हणजे आपल्याशी आई-वडील खोटे बोलले हे शल्य त्यांना असते आणि तिसरे म्हणजे आई-वडिलांना याबाबत कसे विचारायाचे हे द्वंद मनात सतत सुरू असतं.
 
 
वरील सर्व बाबींचा परिणाम मुलांच्या वर्तणुकीवर होतो व त्यातूनच मुलं आई-वडिलांचे न ऐकणे, अभ्यासात मागे पडणे, आई-वडिलांपेक्षा मित्रांचे आई-वडील जवळचे वाटणे, सतत विचारात रहाणे, झोप न येणे यासारख्या एक नाही असंख्य समस्या मुलांमध्ये उद्भवू शकतात. दुसरी बाजू आई-वडिलांना आपल्या मुलाला बाहेरून कळले याची कल्पनाच नसते. मुलांच्या वर्तनाविषयक समस्या जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा पालक संस्थेकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जातात. सखोल अध्ययनातून व अनुभवातून मुलांना येणार्‍या समस्यांचा उलगडा होतो. मुलाला दत्तकाबाबत कुठून तरी समजलेले असते व तेव्हापासून तो अस्वस्थ असतो, याची जाणीव पालकांना होते. पालक स्वत: सागंण्यास धजत नसल्यास कुणाच्या तरी मदतीने सत्य मुलांना सांगण्यात येते. बरेचदा मुलं स्वत: पालकांना हा प्रश्न विचारतात. पालकांनी सत्य वाटेल, असे उत्तर मुलांना दिल्यास मुले वस्तुस्थिती स्वीकारतात. पण उत्तर न देता टाळाटाळ केल्यास परिस्थिती चिघळत जाते व आई-वडिलांवरचा मुलांचा विश्वास कमी होतो. त्यामुळे मुले नकारात्मक वागायला लागतात. माझी खरी आई कोण याची उत्सुकता अधिक वाढते. कारण दत्तक आई-वडिलांबद्दल किंतु-परंतुची भावना मनात घर करून बसवलेली असते. आजपर्यंत अतिशय प्रिय व आदर्श असणारे आई-वडील मुलांना परके वाटू लागतात व ते स्वत:ला पोरके व एकाकी समजू लागतात. मुलांची ही स्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून मित्र-मैत्रिणींनो आपल्या प्रेमावर विश्वास ठेवा, दत्तकाच्या आपल्या निर्णयावर विश्वास ठेेवा व मुलांना दत्तकाबाबत वेळीच सांगा. जैविक पालक असो की दत्तक पालक, मुलांवर डोळस प्रेम करा आणि आपल्या पालकत्वावर विश्वास ठेवा, यश निश्चितच आहे.
 
 
गेल्या 29 वर्षांपासून वरदान आय. ए. पी. ए. अॅण्ड चाईल्ड वेलफेअर संस्था दत्तकासाठी काम करीत आहे. दत्तकपूर्व व दत्तकोत्तर समुपदेशनाच्या सेवा संस्थेद्वारे पालकांना सातत्याने देण्यात येतात. मी गेल्या 27 वर्षांपासून दत्तक क्षेत्रात काम करीत आहे. कुटुंब हा मुलांचा अधिकार सुरक्षित करण्यासाठी संस्था कायद्याच्या कक्षेत राहुन सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. 
 
 
9421779753