‘झाड कटई ले झाड!’

    दिनांक :17-Nov-2019
 
 
 
राज्य शासन 33 कोटी वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करीत आहे. 33 टक्के जमीन वनाच्छादित न राहिल्यास काय परिणाम भोगावे लागतात, हे आपण पाहतोच आहोत. राज्य शासन निरनिराळे उपक्रम राबवून वृक्षलागवडीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करीत असताना, जंगल कटाईचे दुष्परिणाम आपण भोगत असताना दररोज, अगदी नित्यनेमाने, ‘दही घ्या दही,’ ‘कांदे, बटाटे, चवळी, कोबी, भरताचे वांगे’ म्हणत फिरणारे भाजीवाले, गव्हाचे मुरमुरे विकणारे यांचा ज्याप्रमाणे दररोज आवाज ऐकू येतो, तद्वतच सध्या ‘झाड कटई ले झाड’ असा आवाज कानावर पडत आहे. केवढे दुर्दैव त्या राज्य शासनाचे! गेली ना मेहनत पाण्यात. एक वेळ दही विकणार्‍यांचा आवाज तुम्हाला आठ दिवसांतून एकदाच येईल. कारण पशुधन राहिले नसल्याने व ‘हल्दीराम’चे तयार मिळत असल्याने घरोघरी जाऊन दूध, दही विकणार्‍यांची संख्या तसेही कमी झाली आहे. परंतु ‘झाड कटई ले झाड’ हा आवाज दररोज तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहत नाही. झाड कापणे हा रोजगार होऊ शकतो का? आणि याला मान्यता मिळतेय्‌ तरी कशी? म्हणजे लोक त्यांच्याकडून का कापून घेताहेत झाडे? अगदी नित्यनेमाने सायकलवर कुर्‍हाड, दोर घेऊन गल्लोगल्ली फिरणारे युवक दररोज दिसताहेत. या युवकांचे काही चुकत असेल असे कुणी म्हणणार नाही. पोटापाण्याचा त्यांचा तो व्यवसाय आहे. कदाचित झाडे कापल्याचे परिणाम त्यांना माहिती नसावे िंकवा स्वार्थासाठी ते हा व्यवसाय करीत असावे. काहीही असो, कानावर ‘झाड कटई ले झाड’ ऐकू आले की कानशिलातून गरम वाफा न निघणारा वृक्षप्रेमी होऊच शकत नाही. सायकलवर झाडे तोडण्यासाठी फिरणार्‍या युवकांचे प्रबोधन करण्याचे काम कुणाला तरी करावे लागेल. कारण गेल्या काही वर्षांत विहीर खोदून देणारे आणि झाडे तोडून देणार्‍यांची संख्या वाढत आहे. हे दोन्ही व्यवसाय परस्परांशी निगडित आहेत बघा. झाडे तोडली की विहिरी खोदाव्याच लागणार, हे नक्की. शासनाने गारुडी बंद केले, सर्कशीतील वन्यप्राण्यांची परवानगी नाकारली समजू शकते. तद्वतच ‘झाड कटई ले झाड’ म्हणून फिरून पर्यावरणाचा र्‍हास होण्यास मदत करणार्‍यांचेही प्रबोधन करणे गरजेचे आहे. या युवकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देणेही आवश्यक आहे. अन्यथा सध्याची पिढी ऐकतेय्‌, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,’ ‘झाडे जगवा, पर्यावरण वाचवा.’ यापुढील पिढीच्या कानावर शब्द ऐकायला मिळतील, ‘झाड कटई ले झाड.’ म्हणजे त्यांचा गैरसमज असा होऊन जाईल की, झाडे कापण्यासाठीच असतात. आधीच तर आपण झाडे कापण्याचे परिणाम चांगलेच भोगतो आहोत. यावर त्वरित अंकुश न लागल्यास परिस्थिती आणखी हाताबाहेर जाईल, यात शंका नाही. आधीच तर मायेची सावली गमावून बसलो आहोत. जी काही थोडीफार झाडांची सावली मिळतेय्‌, ती देखील गमावून बसण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले!
‘इस बार इंतिजाम तो सर्दी
का हो गया
क्या हाल पेड कटते ही
बस्ती का हो गया’
र्ींनोमान चौक
आनंद विनायक मोहरील
दीनदयालनगर, नागपूर
7218202502