जाणून घ्या गृहखरेदी करताना

    दिनांक :18-Nov-2019
अनेकांना शहराच्या मध्यवस्तीत घर घ्यायची इच्छा असते. मात्र या भागातल्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या असल्यामुळे ही घरं सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरची असतात. मात्र ग्राहकांची गरज लक्षात घेऊन विकासकांनीही आपल्या धोरणात काही बदल करायला सुरूवात केली आहे. मध्यवस्तीत लहान आकाराची घरं बांधून बहुसंख्य ग्राहकांना परवडणार्‍या किंमतीत उपलब्ध करून देण्यावर विकासकांचा हल्ली भर असल्याचं दिसून येतं. मुंबईसारख्या महानगरात मध्यवस्तीत घर घेणं सर्वसामान्यांना शक्य होत नाही. त्यातच या भागातली घरं मोठी असल्यामुळे त्यांच्या किंमती काही कोटी रुपयांच्या घरात जातात. मात्र आता नावाजलेले विकासक शहरातल्या मध्यवर्ती भागात एक आणि दोन बीएचके फ्लॅट्स उपलब्ध करून देत आहेत. यामुळे उच्च मध्यमवर्गीयांचं मध्यवस्तीत घर घेण्याचं स्वप्न साकार होऊ शकतं. 

 
 
 
बरेच विकासक हा मार्ग अवलंबत आहेत. मात्र या वाटेने जाण्यापूर्वी विशेष काळजी घेण्याची गरज जाणकार अधोरेखीत करतात. ग्राहकाच्या नजरेतून पाहता घरखरेदी ही मोठ्या जबाबदारीची आणि खर्चिक बाब असते. तज्ज्ञांच्या मते निवृत्तीचं वय जवळ येत असताना घर खरेदी करत असल्यास घाईघाईने निर्णय घेऊ नये. घरखरेदी ही शक्यतो उमेदीच्या वयातच केली जावी. ती नंतर करायची असेल तर आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेचा सांगोपांग विचार करूनच घरखरेदीत पैसे गुंतवावेत. घरातल्या पैसा तरलतेचा विचार करता घरामध्ये गुंतवलेला पैसा झटपट परत मिळवणं अशक्य असतं. त्यामुळे आपले भविष्यातले सर्व खर्च भागवण्याएवढा निधी शिल्लक असेल तरच वाढत्या वयात घरखरेदीचा विचार करावा. अर्थात कोणत्याही वयात घर खरेदी करताना कागदपत्रांची कायदेशीर छाननी अत्यंत काटेकोरपणे आणि वकिलाच्या सल्ल्यानंच करावा. कितीही जवळचे संबंध असले तरी विक्री करणार्‍याच्या निव्वळ शब्दावर विसंबून घरखरेदीचा व्यवहार करू नये. घराचा परिसर आणि तिथे घेतलेल्या घराच्या भविष्यकालीन किंमतीचा अंदाज घेऊनच खरेदीचा निर्णय पक्का करावा.