शरद पोंक्षे साकारणार खलनायकाची भूमिका

    दिनांक :18-Nov-2019
मुंबई,
उत्तम अभिनयशैलीच्या बळावर मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये चतुरस्त्र भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे ‘आक्रंदन’ या आगामी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असून त्यांचा वेगळाच दरारा या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवयाला मिळणार आहे.
 
 
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, ‘राजाभाऊ’ ही व्यक्तिरेखा मी साकारली असून हा सरपंचाचा लहान माजोरडा भाऊ असून सरपंचाच्या मागे कायम अडचणी निर्माण करण्याचे काम हा करत असतो. अनेक दृष्ट कृत्ये, अनैतिक धंदे, गावच्या स्त्रियांना त्रास देणे, यामुळे गावात त्याची दहशत असते. अशा पद्धतीची ही व्यक्तिरेखा आहे. मी माझ्या स्टाईलने त्यात रंग भरले आहेत. ‘आक्रंदन’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शकांनी अतिशय संवेदनशील विषय हाताळला आहे. जातीपातीचे राजकारण आजही आपल्याकडे सुरु आहे. आपल्याला त्याची दाहकता दिसून येत नाही. ही दाहकता दाखवतानाच एका मोठ्या बदलाची व पुढाकाराची गरज हा चित्रपट अधोरेखित करतो.
'आक्रंदन’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शरद पोंक्षे यांच्या सोबत उपेंद्र लिमये, विक्रम गोखले, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी तेजश्री प्रधान, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या भूमिका 'आक्रंदन' मध्ये पहाता येणार आहेत.