अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट

    दिनांक :18-Nov-2019
मुंबई,
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी विरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला. न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल शेवटी एक हजार रुपयांचा दंड आकारत ठाणे न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. न्यायालयात हजर राहण्यासाठी वारंवार प्राजक्ताला समन्स जारी करण्यात आला होता. मात्र, ती एकदाही न्यायालयात हजर झाली नाही. प्राजक्ता माळी विरोधात ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदाने ठाणे कोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाणे दंडाधिकारी कोर्टात सुरू असलेल्या या खटल्याविरोधात प्राजक्ताच्या वतीने सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
 

 
 
आपल्याच ड्रेस डिझायनरसोबत केलेली हाणामारी प्राजक्ताला चांगलीच भोवली आहे. कारण तक्रारदार जान्हवी मनचंदाने केवळ पोलिसांकडे तक्रार न देता प्राजक्ताच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. प्राजक्तानेच आपल्याला काम मिळवून दिले होते, म्हणून आतापर्यंत तिचा हा स्वभाव सहन केला. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेली, असे जान्हवीचे म्हणणे आहे. मूळातच काहीसा रागीट स्वभाव असलेल्या प्राजक्ताने याआधीही इतरांसोबत असे वाद घातल्याचा जान्हवीचा दावा आहे.