नागराजचा झुंड वादाच्या भौऱ्यात

    दिनांक :18-Nov-2019
 
 
फॅन्ड्री, सैराट आणि नाळ या सिनेमांच्या माध्यमातून मराठीतील चित्रपट सृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविणारे  सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभनयाचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’ चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
हैद्राबादमधील चित्रपट निर्माते नंदी कुमारने ‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कॉपीराईट उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस पाठवली आहे. कुमार यांनी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे, टी-सीरीजचे अध्यक्ष भूषण कुमार, अमिताभ बच्चन आणि चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहेत ते विजय बरसे यांना देखील नोटीस पाठवली आहे. मात्र या नोटीसला फक्त टी-सीरीजने उत्तर दिले असून त्यातून काहीही भूमिका स्पष्ट होत नसल्याचे कुमार यांनी म्हटले आहे.
 

 
‘झुंड’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी फसवणुक केल्याचा आरोप करत कुमार यांनी चित्रपटगृह, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चित्रपटाचे प्रदर्श थांबवण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. २०१७ मध्ये कुमार यांनी स्लम सॉकर खिलाडी अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्यासाठी त्याचे हक्क विकत घेतले. त्यानंतर कुमार यांनी ‘स्लम सॉकर’ या चित्रपटाची कथा लिहिण्यास तसेच चित्रपटाची निर्मिती करण्याची योजना आखली. अखिलेश पॉल हा नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणारा व्यसनी मुलगा असतो. त्याचबरोबर त्याला फुटबॉलची आवड असते. त्या आवडीतूनच त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. ११ जून २०१८ रोजी चित्रपट निर्माते कुमार यांनी या चित्रपटाच्या कथेची अधिकृतरित्या तेलंगणा सिनेमा रायटर असोसिएशनकडे नोंद केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पण आता मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अखिलेश पॉल यांना प्रशिक्षण देणारे विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचे हक्क विकत घेतले आहेत. तसेच चित्रपटात विजय बरसेसह अखिलेश पॉलचा जीवन प्रवास दाखवण्यात येणार आहे. म्हणून कुमार यांनी नागराज मंजुळे आणि चित्रटातील काही व्यक्तींवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.