'इफ्फी'त मराठी सिनेमांचा षटकार

    दिनांक :19-Nov-2019
देश-विदेशातील कलाकारांबरोबरच परदेशातील फिल्ममेकर्सना ज्या भारतीय सिनेमहोत्सवाची आतुरता असते तो ‘इफ्फी’ (दि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) चित्रपट महोत्सव लवकरच गोव्यात सुरू होतोय. या सिनेमहोत्सवाच्या यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी सिनेमांनी जोरदार षटकार ठोकला आहे. यातील ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागात यंदा सहा मराठी सिनेमे झळकणार आहेत. त्यामुळे मराठी सिनेमा सातासमुद्रापार पोहोचण्यास मदत होणार आहे.
 


 
यंदा ‘इफ्फी’चे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे सिनेरसिक मोठ्या संख्येने महोत्सवात येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव रंगेल. भारतातल्या समकालीन सिनेमांचा आवाका जागतिक पातळीवर समजावा यासाठी महोत्सवातला 'इंडियन पॅनोरमा' हा विभाग ओळखला जातो. देशभरातील विविध प्रादेशिक आणि हिंदी सिनेमांतून सर्वोत्कृष्ट सिनेमांचे प्रदर्शन इंडियन पॅनोरमामध्ये होते. यंदा या विभागात सहा मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत.
‘इंडियन पॅनोरमा’त भारतीय भाषांतील २६ फिचर आणि १५ नॉन फिचर असे एकूण ४१ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आयला ', समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ ', शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा', अनंत महादेवन दिग्दर्शित 'माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५', आदित्य राही आणि गायश्री पाटील दिग्दर्शित 'फोटो प्रेम' या मराठी सिनेमांचा समावेश आहे. तर बंगाली आणि मल्याळम भाषेतील प्रत्येकी तीन चित्रपट आहेत.
सुवर्ण मयूरच्या शर्यतीत
जगभरातील सर्वोत्कृष्ट पंधरा सिनेमांची निवड यंदा 'इफ्फी'तील सुवर्ण मयूर पुरस्कार स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. सुवर्ण मयूरच्या शर्यतीत चीन, ऑस्ट्रिया, ब्राझील, फ्रांस आदी देशांमधील सिनेमांसह अनंत महादेवन दिग्दर्शित 'माई घाट : क्राईम नंबर १०३|२००५' या एकमेव मराठी सिनेमाची निवड झाली आहे. हा सिनेमा केरळमधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. पोलिस कोठडीत मरण पावलेल्या एका मुलाच्या आईची कहाणी हा सिनेमा मांडतो. अभिनेत्री उषा जाधव यात मुख्य भूमिकेत आहे.