बरेच झाले युती तुटली...

    दिनांक :19-Nov-2019
ही केवळ राजकीय भावनानाही तर जनभावनाही झालेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर जवळपास तीन दशक चाललेली भाजपा आणि शिवसेना युती शिवसेनेच्या सत्तेसाठी हपापलेल्या भूमिकेमुळे अखेर तुटली आहे. असुसंस्कृत आणि अविवेकी मित्रापेक्षा सभ्य विरोधक परवडले, या न्यायाने युती तुटल्यावर भाजपा कार्यकर्तेच नाही तर सामान्य जनतेही हीच भावना आहे. परवा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला त्यांना अभिवादन करण्यासाठी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस गेल्यावर तिथे शिवसैनिकांनी जी काय शेरेबाजी केली, त्यानंतर तर ‘बरेच झाले वेगळे झालो’ या भावनेवर शिक्कामोर्तबच झाले. तो साराच प्रकार केवळ अश्लाघ्य आहे.
 
महाराष्ट्रच नव्हे तर भारतात कुठल्याच राज्यांत राजकारण इतक्या शिवराळ स्तराला जावून कुणी करत नाही. बरे, बाळासाहेबांचे समाधीस्थळ हे काही राजकारण करण्याचे ठिकाण नाही अन्‌ त्यांच्या वियोगाचा तो स्मृती दिवस काही तुमच्या सत्तालोभाची खदखद काढण्याचा दिवस नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची राजकीय परंपराही नाही. अर्थात शिवसेनेकडून इतक्या सभ्यतेची अपेक्षाही नाही. उलट त्यांनी देवेंद्र फडणविसांचे स्वागत आपला मित्र म्हणून नव्हे तरीही एक बडा नेता, माजी मुख्यमंत्री म्हणून सन्मानाने केले असते तर ते आश्चर्याचे ठरले असते.

 
महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीत शिवसेनेची अवस्था भांडखोर जोडीदारासारखी झाली आहे. व्यक्तींच्या सार्वजनिक आणि वैयक्तीक आयुष्यात टकराव होतो. नापसंती येत असते, मात्र कुटुंब, स्नेही आणि समाज, राज्याच्या हिताचा विचार करता समंजसपणा दाखविला जाण्यालाच प्रगल्भता म्हणतात. ती शिवसेने या आधीही कधी दाखविली नाही अन्‌ आता तर तिचा कडेलोटच झालेला आहे. राज्यातील जनतेच्या व्यापक हितासाठी भाजपा समजून घेत, संयमाने वागत असतांना शिवसेनेने मात्र टोकाची भूमिका घेतली आहे. आपण सत्तेसाठी किती हपापालेलो आहे, हे शिवसेना आपल्या वागणुकीतून दाखवून दिले आहे. शिवसेनेने भाजपासोबतची युती आपल्या आततायी भूमिकेमुळे तोडली आहे. शिवसेना हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागली आहे. यात भाजपाचे तात्कालिक नुकसान दिसत असले तरी दीर्घकालिन फायदा आहे. शिवसेनेचा मात्र, दीर्घकालिन नुकसान आहे.
 
भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. प्रेमात ज्याप्रमाणे व्यक्ती आंधळी होऊन जाते, त्याप्रमाणे राजकारणातही आंधळी होत असल्याचे शिवसेनेने आपल्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थानाला तसेच प्रतिष्ठेला कोणत्याही प्रकारे साजेसे नसलेल्या मुलासोबत लग्नासाठी पळून जाणार्‍या मुलीसारखी शिवसेनेची भूमिका आहे. घरुन पळून तर गेलो, पण मुलगा आता लग्न न करता नुसताच फिरवतो, आहे, अशी स्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची केली आहे. यामुळे शिवसेनेची स्थिती उद्या गाढव आणि ब्रह्मचर्य दोन्ही गेले, अशी झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कोणताही राजकीय पक्ष उघडपणे काही सांगत असला तरी तो राजकारण हे स्वत:च्या राजकीय फायद्यासाठीच करत असतो. समाजाचे, शोषित, वंचित, पीडित जनतेचे कल्याण या गोष्टीही असतात, मात्र ती जोड असते. राजकीय पक्षांनीच नाही तर व्यक्तींनीही स्वार्थाचा विचार करण्यात गैर नाही, मात्र त्यासाठी आपण कोणत्या टोकाला जातो, कंबरेचे सोडून तर डोक्याला गुंडाळत नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जी घोषणाबाजी शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी केली, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. आज तुम्ही युती तोडली असली, याच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपण पाच वर्ष होतो, सत्ता उपभोगली याचे भान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नसले तरी स्वत:ला शिवसेनेचे नेते म्हणवणार्‍यांनी ठेवायला हवे होते. मुळात आज भाजपा आणि शिवसेनेतील जे संबंध तणावपूर्ण झाले त्याला देवेंद्र फडणवीस नाही तर उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी आधीच्या आपल्या सरकारमध्ये तसेच आता पुन्हा दर्शवली होती. राजकारणात वेगवेगळ्या विचारधारेचे लोक असतात, त्यांच्याशी तुमचे मतभेद असले पाहिजे, मनभेद नाही; पण शिवसेनेने तर मतभेदासोबत आपण मनभेदही ठेवतो, हे शिवतीर्थावरीला आपल्या वागणुकीने दाखवून दिले.
 
महाराष्ट्रात याआधीही अनेक राजकारणी होऊन गेले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणविरहित मैत्रीची साक्ष आजही दिली जाते. त्यांच्या प्रकट गप्पांचे कार्यक्रमही झालेले आहेत. सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन्ही नेते सभागृहाच्या बाहेर येताच गळ्यात गळा घालून फिरायचे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची जुगलबंदी अफलातून राहात होती, भाषणात एकदुसर्‍याची ते मनसोक्त खिल्ली उडवायचे, पण यामागे शत्रुत्वाची भावना कधीच नसायची तर असायची निखळ मैत्रीची भावना. अगदी महाराष्ट्रात तिकिट लावून या दोघांच्या भाषणाचे कार्यक्रम झाले आहेत. भाजपा आणि शिवसेनेतील युती तुटली असली तरी तसा मैत्रिपूर्ण आदर्श उद्धव ठाकरे यांना दाखवता आला नसता का? फडणविसांच्या संदर्भात जे काय झाले ते उद्दाम आणि अतिउत्साही, बेछूट शिवसैनिकांनी केले, हे खरेच; पण उद्धव ठाकरे यांनी त्यांना फटकारायला हवे होते. झाल्या प्रकाराबद्दल माफी मागायला हवी होती. त्यात त्यांची प्रतिमा उंचावली असती. राजकारणांत दीर्घकाळ कुणीच कुणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, त्यामुळे दूर जाताना जवळ येण्याचे सर्व मार्ग कायम ठेवून जायचे असते, हेही उद्धव ठाकरे यांना कळू नये का?
 
शरद पवारांबद्दल अनर्गल बडबड केल्यावर आता सत्तेसाठी त्यांच्याच दाराशी चार वेळा जावे लागत असताना तरी शिवसेनेच्या नेत्यांना संबंधांचे हे भा यायला हवे होते. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि सुस्वभावी नेत्याची आहे, याची भान शिवसेनेच्या नेत्यांनी ठेवले पाहिजे. आज आपल्या राजकीय स्वार्थासाठी शिवसेना मित्राला शत्रू समजत असेल तर उद्या शत्रूला म्हणजे भाजपाला मित्र समजणारच नाही, याची खात्री ते तरी देऊ शकतील का? यासाठी आपली वागणूक शिवसेनेने संयमाची ठेवली पाहिजे. अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तसेच रालोआ सोडायला शिवसेनेला भाजपाने सांगितले नव्हते. शिवसेनेनेच अरविंद सावंत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगत स्वत:हूनच रालोआ सोडली. मग शिवसेना ही रालोआची संस्थापक आहे, हे म्हणत भाजपावर कारण नसताना आगपाखड करण्याचा शिवसेना नेते संजय राऊत तसेच विनायक राऊत यांना अधिकार नाही.
 
शिवसेनेने आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. त्यामुळे त्याची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली आहे. आपण काय करतो, याचे भान त्याला राहिले नाही. आपल्या चुकीचे खापर दुसर्‍यावर फोडण्यात तो दंग आहे. भाजपासारखा मित्रपक्ष गमावून आपण केवढी मोठी चूक केली, हे जेव्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजेल, तेव्हा वेळ निघून गेलेली असणार आहे. आपल्या या चुकीची किंमत शिवसेनेला आयुष्यभर मोजावी लागणार आहे.