सायनाच्या बायोपिकमध्ये मानव कौल साकारणार महत्वाची भूमिका

    दिनांक :19-Nov-2019
मुंबई,
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या बायोपिकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेत्री परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदची महत्वाची भूमिका अभिनेता मानव कौल साकारणार आहे. सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहेत.
 


 
 
परिणीतीच्या आधी अभिनेत्री श्रद्धा कपूर सायनाच्या जीवनपटात झळकणार होती. मात्र, तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून आपला पाय बाहेर काढला आहे. तिच्या जागी परिणीती चोप्राची वर्णी लागली. त्यानंतर चित्रपटातील दुसरे महत्त्वाचे पात्र असणाऱ्या प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या भूमिकेसाठी कलाकाराचा शोध सुरू झाला आणि अभिनेता मानव कौल याची निवड करण्यात आली. मानवने त्याच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'सायना नेहवालच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतील माझा फर्स्ट लुक...' असं लिहून त्यानं सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत.