'तानाजी : द अनसंग वॉरियर'चा ट्रेलर प्रदर्शित

    दिनांक :19-Nov-2019
मुंबई,
'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द  अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असे म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींच्या शौर्याची गाथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.
 
 
 
पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. या कोंढाण्यावर पुन्हा भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवरायांसह स्वराज्यातील प्रत्येकाने पाहिले आणि शिवरायांचा बालपणीचा मित्र आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यासह मावळ्यांनी कोंढाणा जिंकलाच. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. तानाजींचे शौर्य, पराक्रम, जिद्द आणि नेतृत्व हा प्रत्येक पैलू या ट्रेलरमध्ये उलगडला जातो. तानाजी मालुसरेंच्या बलिदानाची साक्ष देणारा हा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
 
 
'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटातील इतर कलकारांचे लुक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटात काजोल तानाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच चित्रपटात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदेभान राठोड या अधिकाऱ्याच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे.