हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील जखमी शिपायाचा मृत्यू

    दिनांक :02-Nov-2019
नागपूर, 
माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यात असलेल्या सीआरपीएफच्या वाहनाला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहायक उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. विजयकुमार (52 वर्षे) असे या सहायक उपनिरीक्षकाचे नाव असून ते केंद्रीय राखीव पोलिस बल गट 221 येथे कार्यरत होते. विजयकुमार हे मूळ जबलपूर (म. प्र.) चे राहणारे होते. 

 
 
 
केंद्रीय राखीव पोलिस बलाचे एक पथक माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. एक महिन्यापूर्वी सकाळी अहिर हे चंद्रपूर येथून दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा पथक होते. समुद्रपूर (जि. वर्धा) येथून अतिशय वेगात हे पथक नागपूरकडे येत असताना एका वळणावर एक टिप्पर केंद्रीय राखीव सुरक्षा बलाच्या वाहनासमोर आले. त्यामुळे सुरक्षा पथकाचे वाहन टिप्परवर आदळले. या अपघातात दोन शिपायांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. त्यात विजयकुमार यांचा समावेश होता. गंभीर अवस्थेत विजयकुमार यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जगनाडे चौकातील सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मृत्यूशी झुंज देत असतानाच शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास विजयकुमार यांचा मृत्यू झाला.
 
 
विजयकुमार यांना पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जबलपूरला नेण्यात येईल, असे सीआरपीएफच्या सूत्रांनी सांगितले.