कारंजाचे तीन जावई करीत आहेत विधानसभेचे प्रतिनिधीत्व

    दिनांक :02-Nov-2019
अभय खेडकर
कारंजा लाड,
वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहर हे अनेक विशेषणांनी बहरुन गेले आहे. नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान, जैधर्मियांची काशी, प्राचिन कृषी उत्पन्न बाजार समिती, शैक्षणिक नगरी आणि शिवाजी महाराजांनी या नगरीतील द्रव्य (सोने, पैसा) नेवून स्वराज्यासाठी वापरला, अशी ख्याती असलेले लक्ष्मी व सरस्वती सोबत नांदत असलेले हे गाव प्रसिद्ध असून, यंदाच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडुन आलेले तीन विद्यमान आमदार कारंजाचे जावई असून, विधानसभेचे प्रतिनिधीत्व करित आहेत. त्यांच्या अर्ध्यांगिणी असेलल्या तीन लेकीमुळे कारंजाच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला असून, सोशल मिडीयावर कारंजाच्या लेकी व तीन भाग्यवान जवाई अशी चर्चा होत आहे. 

 
 
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेकांनी आपले नशिन आजमावून विधानसभा प्रतिनिधीत्व प्राप्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. अशा या राजकारणाच्या आखाड्यात तीन विविध ठिकाणी यश मिळविलेले विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे कारंजा नगरीचे जावई असून, कारंजाच्या लेकी ह्या त्यांच्या अर्धांगिणी आहेत. त्यापैकी विद्यमान आमदार दिलीपराव वळसे पाटील (अंबेगाव शिरुर मतदार संघ राकॉ), आमदार हरिष मारोतीआप्पा पिंपळे (मुर्तिजापूर मतदार संघ भाजप), आमदार राम सातपुते (माळशिरस मतदार संघ भाजपा) हे आहेत.
 

 
 
या तिनही आमदारांच्या अर्धांगिणी कारंजा येथील रहीवासी असून, त्या तिघींचेही शिक्षण सुद्धा कारंजा नगरी येथेच झाले आहे. दिलीपराव वळसे पाटील यांच्या पत्नी किरण उत्तमरावजी डहाके असून, त्या माजी आमदार प्रकाशदादा डहाके यांच्या भगिनी आहेत. 

 
 
हरिष पिंपळे यांच्या अर्ध्यांगिणी नुतन हरिष पिंपळे ह्या कारंजा येथील रहिवासी असून, शामआप्पा कलचिळे यांच्या कन्या आहेत. आ. राम सातपुते हे भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच मुख्यमंत्री यांचे निकटवर्तीय असून, उच्च विद्याविभूषीत आहेत. कारंजा नगर परिषद शाळा क्र. 4 येथील शिक्षिका प्रमिलाताई गाठेकर रा. संतोष माता कॉलनी यांचे जावई आहेत.
 
 
विशेष बाब म्हणजे कारंजाच्या किरणताई डहाके, नुतनताई कलचिळे, संस्कृती गाठेकर ह्या तिनही लेकी उच्च विद्याविभूषीत आहेत. यानिमीत्ताने कारंजा नगरीच्या तीन लेकी विद्यमान आमदारांच्या अर्ध्यांगिनी असून, भविष्यात या आमदारापैकी पिंपळे व सातपुते यांना मंत्रीपदाची सुद्धा संधी असल्यचे भाकित केल्या जात आहे. या तिनही विद्यमान आमदारांमुळे या घटनेशी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारचे माजी मुख्यमंत्री असलेले कैलाश जोशी यांची कन्या ही कारंजा येथील डॉ. ओमप्रकाश शमार्र् यांची अर्धांगिनी आहे. या विविध घटनामुळे कारंजा शहर सध्या चर्चेत असून, कारंजाचे जावई कर्तुत्वान आहेत व त्यांना कारंजाच्या लेकीची चांगली साथ संगत असल्यामुळेच सर्व वैभव प्राप्त झाले आहे, अशी चर्चा आहे.