चीनचे शहाणपणाशी वैर!

    दिनांक :02-Nov-2019
कितीही मोठी आर्थिक शक्ती असली आणि लष्करी सामर्थ्य असले, तरी चीनने आता शहाणे होण्याची गरज आहे. चीन म्हणजे बुद्धी व मुत्सद्दीहीन नेत्यांचा पाकिस्तान नाही. त्यामुळेच लडाख प्रांताला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्याच्या भारताच्या कृतीवर चीनने आक्षेप घ्यायला नको होता. पण, तसे झालेले दिसत नाही. 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर राज्याचे राज्यपण संपुष्टात आले आहे आणि त्यातून केंद्र सरकारने दोन केंद्रशासित प्रदेश तयार केले आहेत. या निर्णयाला संसदेनेही दोनतृतीयांश बहुमताने मान्यतेची मोहोर उमटवली आहे. त्यामुळे यावरून चीनने गुरगुरण्याचे काहीएक कारण नाही.
जम्मू-काश्मीर (ज्यात लडाखही येतो) भारताचाच भाग आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. आता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे सीमेवर काही समस्या निर्माण झाल्या असल्या, तरी हा संपूर्ण भाग भारताचा आहे, यात काही फरक पडत नाही. जर जम्मू-काश्मीर राज्य तत्कालीन महाराजा हरििंसह यांनी भारतात सामील केले आहे, तर याचा अर्थ त्या राज्याच्या सीमा भारताच्या झाल्या आहेत. फाळणीच्या वेळी भारताचे नेतृत्व फाजील उदार, उतावळे, अल्पदृष्टीचे आणि कुठल्याशा स्वप्नसृष्टीत वावरणारे असले, तरी त्याचा गैरलाभ घेऊन आपली सीमा भारताच्या हद्दीत घुसविण्याचा क्षुद्रपणा चीनने करायला नको होता. आधीच स्वत:कडे एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असताना चीनने अक्साई चीन प्रदेशाचा काही भागही बळकावून जो हावरटपणा केला, तो त्याला शोभणारा नाही. कसेही करून स्वत:च्या सीमा वाढविण्याची विस्तारवादी, मध्ययुगीन वृत्ती आजच्या काळात चालत नाही. चीन एवढ्यावरच थांबला नाही. पाकिस्तानने अवैध रीत्या बळकावलेल्या गुलाम काश्मीरमधील काही भागही चीनला सप्रेम भेट घेण्यास लाज वाटली नाही. ‘सासूबाईच्या जिवावर जावई उदार’ या म्हणीनुसार, पाकिस्तानने स्वत:ची मालकी नसलेली, भारताची बळकावलेली भूमी, 1963 साली चीनशी एक सीमा करार करून त्याला देऊन टाकली. हा तर निर्लज्जपणाचा कळसच झाला. त्या वेळी संपूर्ण भारतात कॉंग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल होता. परंतु, कॉंग्रेस नेतृत्वाला राष्ट्रीय दृष्टीच नव्हती. असले दुबळे नेतृत्व असल्यावर, पाकिस्तान आणि चीनसारखे असभ्य शेजारी शांत थोडीच बसणार होते! जवाहरलाल नेहरू यांच्या हातून झालेले पाप आजही भारत भोगत आहे.
 
 
 
 
परंतु, चीन किंवा पाकिस्तान हे विसरला की, सर्व दिवस सारखे नसतात. आज पाकिस्तानची स्थिती भिकार्‍याहूनही अधिक दयनीय झालेली आहे. दुसर्‍यांच्या शिकारीवर ताव मारणार्‍या कोल्ह्यांच्या लायकीचेच नेते असणार्‍या; तसेच लाल फडके बघून मुसंडी मारणार्‍या सांडाप्रमाणेच वागायचे कुणी ठरविल्यावर त्याचा ‘पाकिस्तान’च होणार! चीनलाही पाकिस्तानच्या मार्गाने जाण्याची खुमखुमी असेल, तर त्याने आज दहादा विचार केला पाहिजे. कारण, पाकिस्तानजवळ गमविण्यासारखे काहीच नाही. परंतु, चीनचे तसे नाही. आजच तो अडचणीत सापडला आहे. अमेरिकेने त्याच्याशी व्यापारयुद्ध पुकारले आहे. चीनमध्ये हुकूमशाही असल्यामुळे तिथली नेमकी स्थिती जगाला समजत नसली, तरी ज्या बातम्या बाहेर येत आहेत, त्यावरून चीन आपल्या अर्थव्यवस्थेच्या ‘वाटचालीमुळे’ हादरला आहे, असे लक्षात येते. चीनच्या आसपास असलेले बहुतेक सर्व शेजारी देश, चीनपेक्षा सर्वार्थाने दुबळे असले, तरी तेही चीन दुबळा होण्याची वाट बघत आहेत. या सर्व शेजार्‍यांशी चीनचे संबंध सौहार्दाचे नाहीत. चीन आपल्याला गिळंकृत करेल, याचीच प्रत्येकाला भीती आहे. दुसरे म्हणजे, आज चीन जगातील एक आर्थिक महासत्ता बनला असला, तरी हा फुगा तर नाही ना, अशी शंका सर्वांनाच आहे. एकदा का चीनमधील आपापली उत्पादन केंद्रे जागतिक कंपन्यांनी काढून घेतली, तर चीनचा हा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही आणि या कंपन्यांच्या तशा हालचाली सुरूही झाल्या आहेत. अशा या अस्थिर वातावरणात चीनने भारताला खाजवण्याचे धाडस करावे, याचे आश्चर्य वाटते. कदाचित पाकिस्तानची पाठराखण करता करता त्याचे काही गुण चीनमध्येही शिरले असावेत, असे वाटते.
आज चीन आणि भारत एकत्र आलेत, तर संपूर्ण जगावर दबदबा निर्माण होऊ शकतो. डॉलरची मक्तेदारी संपू शकते. विशेष म्हणजे, एकोणिसाव्या शतकापूर्वी तसा दबदबा भारत आणि चीनचा होताच. जगाच्या एकूण उत्पन्नापैकी अर्ध्याहून अधिक उत्पन्न या दोनच देशांचे होते. सांस्कृतिकदृष्ट्याही चीन भारताच्या अगदी हृदयस्थ आहे. त्यामुळे भारत आणि चीन यांनी एकत्र येणे कठीण नाही. चीनला अमेरिकेची दादागिरी संपवायची असेल तर भारताशिवाय पर्याय नाही. हे ओळखूनच अमेरिका चीनची दादागिरी संपविण्यासाठी भारताशी जवळीक वाढवत आहे. अशी ही भू-राजकीय स्थिती असताना, लडाखच्या निमित्ताने चीनने भारतावर गुरगुरणे अनाकलनीय आहे.
 
लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याच्या भारताच्या कृतीवर चीनने आक्षेप घेताच, भारताचे त्याला जे प्रत्युत्तर गेले, तसे आतापर्यंत कधी गेले नसावे. आता जुना भारत राहिलेला नाही. अमेरिका आणि चीनच्या बरोबरीने जागतिक पातळीवर बसण्यास तो केवळ उत्सुकच नाही, तर प्रगतिपथावरही आहे. त्यामुळेच भारताने चीनला ठणकावून सांगितले की, जम्मू, काश्मीर व लडाख यासंबंधी काय करायचे तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात चीनने नाक खुपसू नये. दुसर्‍या देशातील वादात नाकच खुपसायचे झाले, तर भारतालाही हॉंगकॉंगमध्ये चीन सरकारविरुद्ध जे जबरदस्त आंदोलन सुरू आहे, त्यावर मतप्रदर्शन करता आले असते. हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी आंदोलनाला अमेरिकेने पािंठबा दर्शविला आहे. इकडून तिकडून तो मदतही करत असेल. परंतु, भारताने त्याबाबतीत संयम दाखविला आहे. खरेतर, जागतिक राजकारणात आपले स्थान मजबूत करण्यासाठी चीनने स्वत: पुढाकार घेऊन भारताशी असलेला सीमावाद संपविला पाहिजे. युद्धात एखाद् वेळी दोन पावले मागे घेतली तर तो काही पराभव नसतो. ती मुत्सद्देगिरी असते. अक्साई चीनचा बळकावलेला भाग भारताला परत करून चीनला भारतात स्वत:बद्दल एक सकारात्मक भावना निर्माण करण्याची संधी आहे. तसेच, स्वत:च्या मांडलिक पाकिस्तानचा कान पिळून त्याला गुलाम काश्मीरचा अवैध ताबा सोडण्यास आणि तो भाग भारताला परत करण्यास चीन सांगू शकतो. यात चीनच्या घरचे काहीच जाणार नाही. उलट, या कृतीमुळे भारत आणि चीन कधी नव्हे इतके जवळ येतील. जागतिक राजकारणाची दिशाच बदलून टाकण्याची शक्ती या दोन देशांकडे येईल. परंतु, हे होईल का? हा खरा प्रश्न आहे. चीनचा विस्तारवादी स्वभाव बघता हे शक्य वाटत नाही.
 
आज अमेरिका आणि भारत, चीनला कोंडीत पकडू शकतो. चीनचा जगातील इतर देशांशी असलेला व्यापार जर या दोन देशांनी हळूहळू तोडत आणला, तर चीनचा दबदबा कोसळू शकतो. नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक राजकारणात जे वेगाने बदल होत आहेत, त्यामुळे तर आपल्या लष्करी सामर्थ्यावर जोरजबरदस्ती करणे, दिवसेंदिवस अवघडच होत जाणार आहे. याचा चीनने विचार करावा, अशी भारताचीही इच्छा आहे. आणि तसेही, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवा भारतही शांतीची पांढरी कबुतरे उडविणारा, पंचशिलाची जपमाळ ओढणारा आणि कडक निषेधाचे निव्वळ खलिते पाठविणारा देश राहिलेला नाही, हे चीनने लवकरात लवकर ध्यानात घ्यावे. भारताची चीनच्या या आगळिकीवरची जी कडक प्रतिक्रिया आली आहे, त्यात हा सुप्त संदेश आहे!