साडेसाती असते तरी काय...

    दिनांक :02-Nov-2019
ज्यांना परमार्थमार्गावर स्वत:ची आत्यंतिक प्रगती करून घ्यायची इच्छा असेल व तेवढे मनोधैर्य असेल, त्यांनी प्राक्तनाचा र्‍हास होण्याच्या दृष्टीने शनीची उपासना अवश्य करावी; पण ज्यांची मनाची तयारी झालेली नसेल त्यांनी शनीच्या वाटेलाही जाऊ नये. विशेषत: पनोतीच्या काळात शनीचे नावही घेऊ नये. शनिमाहात्म्य ही प्राकृत पोथी वाचणारा माणूस तर नुसते ‘शनी’ हे नाव उच्चारताच थरथर कापतो. कारण त्यातील विक्रम राजाची कथा अशी रंगवून सांगितलेली आहे की, ती वाचली की शनीचा पगडा मनावर कायमचा बसलाच म्हणून समजावे. हल्लीच्या विज्ञानयुगात बुद्धीची लांबवर झेप घेणार्‍या माणसाने आपल्या पनोतीच्या काळात शनीची उपासना करून व न करता काय स्थित्यंतरे होतात, याचा तुलनात्मक अभ्यास जरूर करावा. असा अभ्यास करणार्‍या कित्येक व्यक्तींच्या अनुभवातूनच वरील धाडसी निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. 
 
 
आता पुढे प्रश्न असा उद्भवतो की, शनीची पनोती आल्यावर संकटपरंपरा टाळण्यासाठी कोणती उपासना करावी? याचे उत्तर असे की, संकटपरंपरा मुळीच टाळता येत नाही, पण ती सुसह्य करता येते. मनोधैर्य वाढल्यास व अहंकाराचा त्याग केल्यास ही संकटपरंपरा बरीच सुसह्य होते. कारण संकटाचे सैन्य अहंकार नामक सेनापतीच्या आश्रयाने आपला आक्रमणव्यूह रचत असते. जेव्हा सेनापतीच नष्ट होतो तेव्हा सैन्याची दाणादाण व्हायला कितीसा वेळ लागणार?
 
 
अहंकारच नष्ट झाल्यास बिचार्‍या संकटांनी राहायचे तरी कुणाच्या आश्रयाने? नाहीतरी हा अहंकार नष्ट करून त्या जागी आत्मसमर्पण, भक्तिभाव, नम्रता इत्यादी सद्गुणांची स्थापना करण्याच्याच सद्हेतूनेच शनिमहाराज संकटपरंपरा निर्माण करीत असतात. त्यांचे कार्य आपोआपच झाले तर पुढील सर्व व्याप वाचतो.
 
 
म्हणून सर्वच काळी व विशेषतः पनोतीच्या वेळी अहंकाराचा निरास होण्यासाठी देवतोपासना करावी. देवतोपासनेत वंशपरंपरेने चालत आलेली कुलदेवता, पूर्वसंस्काराने लाभलेली इष्टदेवता व इष्टदेवतेची प्राप्ती करून देणारा सद्गुरू या त्रयींचा समावेश होतो. ज्याप्रमाणे गावातील प्रतिष्ठित कार्यकर्त्याचा आश्रय केल्यावर सर्व समस्या आपोआपच सौम्य होतात व मार्ग दिसतो, त्याप्रमाणे देवतोपासना केल्यास शनीची पनोती बरीचशी सौम्य होऊन आध्यात्मिक क्रांती होण्यास मदत होते. लाक्षणिक अर्थाने अशीही प्रथा आहे की, शनीचे दर्शन समोरून घेऊ नये. अतिशयोक्ती सोडल्यास त्यातील गर्भितार्थ एवढाच की, शनीला कृपादृष्टी हा प्रकारच माहीत नाही. शनी जातकाच्या कुंडलीत एकपाद, द्विपाद, त्रिपाद िंकवा पूर्ण दृष्टीने विविध स्थानांचे निरीक्षण करतो. तो एरवीदेखील या स्थानांना धक्के देतोच, पण पनोतीच्या काळात हे धक्के जाणवतात. म्हणून सुज्ञाने पनोतीच्या काळात आपल्या अनुभवानुसार जन्म, लग्न िंकवा जन्मराशीपासून शनीची 3, 4, 5, 7, 9, 10 ही सात स्थाने समजावून घेऊन त्यानुसार नेमका कोणता त्रास किती होणार, याचा अंदाज घ्यावा व मनाची तयारी ठेवावी. त्या जोडीला देवतोपासना केल्यास अधिकस्य अधिकं फलम्‌।