उद्यापनाची कहाणी...

    दिनांक :02-Nov-2019
प्रज्ञा जयंत बापट
 
चातुर्माससमाप्ती म्हणजे तुलसीविवाह! तुळशीचं लग्न!
 
कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसीविवाहचं व्रत असतं. बहुधा पौर्णिमेला तुलसीविवाह संपन्न होतो.
वृंदावन रंगवून त्यातल्या तुळशीला नवीन वस्त्र नेसवतात. अहेव लेणी घालतात. ताम्हणात फुलं आणि अक्षतांमध्ये गोपालकृष्ण असतो. संध्याकाळी तुळस आणि गोपालकृष्णाची पूजा करतात. पूजेला नेहमीप्रमाणे ऋतुकालोद्भव जे असते ते म्हणजे फुलांबरोबर बोरं आणि आवळा ठेवतात. गोरज मुहुूर्तावर लग्न लागतं. मंगलाष्टकं म्हटली जातात आणि तुलसीविवाह संपन्न होतो. 
 
 
नवीन पिढी विचारते, दरवर्षी कृष्णाचं लग्न का करायचं? ते तुळशीसी का करायचं? कधीकधी या विवाहाची खूप िंटगल केली जाते. या विवाहाची कहाणी उद्बोधक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते.
 
 
जालंदर नावाच्या राजाची पत्नी वृंदा. अतिशय सुंदर व पतिनिष्ठ. विष्णूने वृंदावर अत्याचार केला आणि जालंदरला ठार मारलं. वृंदा रागाने-दुःखाने पेटली. ती चूप बसली नाही. तिने आकाशपाताळ एक केलं. स्वतःवरच्या अन्यायाची समाजाला दखल घ्यायला लावली. समाजाने विष्णूला बहिष्कृत केलं. त्याचा शाळिग्राम झाला. शाळिग्राम हे अत्याचारी विष्णूचं रूप आहे. वृंदा वनात गेली. तिथे शोक आणि क्रोधाग्नीत जळून गेली आणि तुळशीमध्ये रूपांतरित झाली. जगन्माता पार्वतीने त्या तुळशीचं लग्न कृष्णाबरोबर ठरवलं आणि विवाहसोहळा संपन्न झाला. पार्वतीने हे व्रत संपूर्ण समाजाला दिलं.
 
 
ही कहाणी काय सांगते?
स्त्रीवर अन्याय झाला तर तिने चूप बसू नये. समाजाला, आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घ्यायला भाग पाडलं पाहिजे. समाजानेही सहृदयतेने, सुबुद्धपणे त्याची दखल घेतली पाहिजे. अन्याय करणारा कितीही उच्च पदस्थ, श्रीमंत असला, तरी त्याला बहिष्कृत केलंच पाहिजे. अशा स्त्रीचं पुनर्वसन करण्याचं व्रत समाजानं घेतलं पाहिजे. तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी, कारण श्रीकृष्णाने स्त्री-सन्मानाची नवी परिमाणं समाजाला दिली. नरकासुराला सत्यभामेच्या मदतीने ठार केलं. त्याच्या कैदेतून हजारो स्त्रिया सोडवल्या. त्या सगळ्यांचं सन्मानपूर्वक पुनर्वसन रुख्मिणीनं केलं व त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. कौरवसभेत अपमानित द्रौपदीनं कृष्णाचं नाव घेतल्याबरोबर कौरवसभा घाबरली, हादरली! अशा श्रीकृष्णाशिवाय कोणता ‘अवतार’ हे दिव्य करू शकतो? तुळशीशी लग्न करून श्रीकृष्णाने तिला प्रतिष्ठा दिली आणि स्वतःलाही प्रतिष्ठित केलं. स्त्री-सन्मानाचं तत्त्व प्रत्यक्ष आचरून स्वतःला सिद्ध केलं. समाजात अशी कुणी दुर्दैवी असेल, तर आधी तिच्या लग्नाचं कर्तव्य पार पाडायचं, मग आपल्या मुला-मुलींची लग्नं आपण करणारच आहोत. या व्रताचा विसर कधीच पडू नये म्हणून हे व्रत दरवर्षी करायचं, सगळ्या समाजानं करायचं.
 
 
शाळिग्राम हे अत्याचारी विष्णूचं रूप आहे. पण, त्याला देवघरातच ठेवतात, लेकी-सुनांना ही ‘कहाणी’ कळावी म्हणून! शाळिग्राम डबीत ठेवून ती डबी फडक्यात बांधून ठेवतात. आजही स्त्रिया त्याला हातही लावत नाही. त्याला हात लावला तर काही भयंकर घडेल, असे मुळीच नाही. पण, अत्याचार्‍याला काय ‘स्थान’ आणि वागणूक दिली पाहिजे, हे प्रत्येक पिढीला कळावं म्हणून शाळिग्राम बंदिस्त ठेवतात. त्याला पूजा रोज नाकारली जाते आणि वृंदावनातल्या तुळशीला पाणी घातल्याशिवाय कुणाचीच पूजा पूर्ण होत नाही.
 
 
चातुर्मासातल्या कहाण्या अर्थपूर्ण आहेत. संकल्पना पुढच्या पिढीपर्यंतही पोचाव्या म्हणून त्यांना कर्मकांडात गुंडाळून ‘धार्मिक पूजा’मध्ये अंतर्भूत करण्यात आलं. पण, केवळ कर्मकांडात गुरफटलं तर मथितार्थ- मूळ हेतूकडे दुर्लक्ष होतं. ते कटाक्षानं टाळलं तर या ‘कहाण्यांमागच्या कहाण्या’ वाचता येतील, त्यांचा अर्थ समजेल. पूजा आणि व्रते आनंदासाठी, उत्साहासाठी असतात. पण, कधीकधी कुटुंबात अकारण ताण-तणाव निर्माण होतो. प्रसादाची चव, करंज्यांंचा रंग, मोदकाचा आकार, हळद-कुंकवाची बोटं, दूर्वा, फुलं, पत्री मिळणं न मिळणं, पूजेची उपकरणी (पितळेची की चांदीची), ओटी गव्हाची की तांदळाची, दिवा तेलाचा की तुपाचा, किती दिवे लावायचे, दिवे पूजेपुरते लावायचे की अखंड, या गोष्टी गौण आहेत. या गोष्टींमुळे तणाव आला, तर पूजेचा आनंद काळवंडतो. ‘देव’ ही संकल्पना आणि मूर्ती हे त्याचं सगुण रूप-दोन्ही, माणसाच्या मनानं, बुद्धीनं आणि हातांनी घडविलेल्या अप्रतिम उच्चतम कृती आहेत.
 
 
9405501769