परतीच्या पावसाने तालुक्यातील धानपिक संकटात

    दिनांक :02-Nov-2019

अहेरी,
धानपिक चांगल्या अवस्थेत असतानाच परतीच्या पावसादरम्यान तालुक्यात अतिवृष्टीमुळे धान शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने बळीराजा हवालदिल झालेला आहे. यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 
 
 
मागील पाच-सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडला. त्यामुळे धानपिकांची अवस्था चांगली होती. हलके धान पिक कापणी होऊन पावसामुळे १५ ते २० दिवसापासून शेतातच आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात धानपिक अंकुरले आहेत. मध्यम व जड जातीचे धान निसण्याच्या मार्गावर आहेत. मात्र परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतातील धानपिक आडवे पडले आहे. कापलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजुन गेल्या. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळयासमोर अंधार निर्माण झाला आहे.
 
 
मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडातील घास हिरावतो कि काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दिवाळीच्या पूर्विपासून अहेरी तालुक्यात एक दिवसाआड पाऊस येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठयाप्रमाणात धानपिकांचे नुकसान होत आहे. याची झळ पिकाला बसली असून हातात आलेले धानपिक शेवटी शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याचे दिसून येत आहे.
 
 
या अवकाळी आलेल्या पावसामूळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढलेला आहे त्या पिक विमा कंपनीने तात्काळ या शेतकऱ्यांच्या धान पिकांची चैकशी करून त्यांना तात्काळ नुकसानीच्या आधारावर पीक विम्याची रक्कम सुध्दा राज्य शासनाकडून तत्काळ मंजूर करण्यात यावी.
 
 
तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे सर्वे करून तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच दुष्काळ जाहिर केल्यानंतर ज्या सोयी सुविधा संपूर्ण अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात याव् अशी मागणी तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गातून होत आहे.