'इफ्फी' २०१९ मध्ये रजनीकांत यांचा विशेष सन्मान होणार

    दिनांक :02-Nov-2019
पणजी,
भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना 'स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. गोवा येथे रंगणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रजनीकांत यांचा गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

 
'मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे की यंदा इफ्फीमधील 'स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड' रंजनीकांत यांना जाहीर होत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, इफ्फीतील जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री इसाबेला ह्युपर्ट यांना प्रदान करण्यात येणार आहे. ' असं जावडेकर म्हणाले.
१९५२साली सुरू झालेल्या या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदाचे ५०वे वर्ष आहे. गोव्यात रंगणाऱ्या चित्रपट महोत्सवात दोनशेहून अधिक चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. इतकंच नव्हे तर, अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके जाहीर झाला आहे, त्यामुळं अमिताभ बच्चन यांचे दर्जेदार चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.
५० वा 'इफ्फी' २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजी, गोवा येथे रंगणार आहे. यावेळी महोत्सवामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांबरोबरच प्रादेशिक भाषांतील २६ चित्रपटांचाही समावेश आहे. तसंच, १५ नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. ५०वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत.
 
 
रजनीकांत यांनी मानले आभार
'स्पेशल आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली अवॉर्ड' जाहीर झाल्यानंतर अभिनेते रजनीकांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारचे आभार मानले आहेत. 'इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मला देऊन माझा गौरव केल्याबद्दल मी भारत सरकारचा आभारी आहे.' असं रजनीकांत यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
पाच मराठी चित्रपटांची‘इफ्फी’साठी निवड
भारताच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 'इंडियन पॅनोरमा' या विभागात पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. पन्नासावे वर्ष साजरे करणाऱ्या 'इफ्फी'मध्ये शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शित 'भोंगा', सुजय डहाके दिग्दर्शित 'तुझ्या आयला', समीर विद्वांस दिग्दर्शित 'आनंदी गोपाळ', अनंत महादेवन दिग्दर्शित 'माई घाट : क्राइम नंबर १०३|२००', आदित्य राही आणि गायत्री पाटील दिग्दर्शित 'फोटो प्रेम' हे पाच मराठी चित्रपट दाखविण्यात येतील. दोन वर्षांपूर्वीच्या महोत्सवात नऊ, तर गेल्या वर्षी दोन मराठी चित्रपट निवडण्यात आले होते. या विभागात मल्याळम्, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांतील चित्रपटांचा वरचष्मा यंदाही कायम आहे.