सुमितने घेतले बिबट्याला दत्तक

    दिनांक :02-Nov-2019
अभिनेता जितेंद्र जोशी एक धमाल आणि अनोखा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेणे. ही मंडळी त्यांच्या खऱ्या आयुष्यात कश्या आहेत, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची सुख-दु:ख, भावूक करणाऱ्या गोष्टी, ते काय विचार करतात, त्यांचा प्रवास आणि बरंच काही जितेंद्र जोशीच्या ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमातून जाणून घ्यायला मिळणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे व सुमीत राघवन या दोन मित्रांनी हजेरी लावली होती. या दोघांच्या आयुष्यातील बरेचसे किस्से कार्यक्रमात ऐकायला मिळाले. यावेळी सुमीतने एक बिबट्या दत्तक घेतल्याचे सांगितले.
 
 
जितेंद्रने सुमीतला प्रश्न विचारला की, ”लोक मुलं दत्तक घेतात, गाव दत्तक घेतात, तू काय दत्तक घेतलंस?” त्यावर सुमीत म्हणाला, ”मी बिबट्या दत्तक घेतलाय.” याविषयी अधिक सांगताना तो पुढे म्हणाला, ”तारा असं त्या बिबट्याचं नाव आहे. एका संस्थेच्या कार्यक्रमात सूत्रसंचालक होतो. त्यावेळी त्या संस्थेचे एका अधिकाऱ्याने मला प्राण्यांच्या दत्तक घेण्याविषयीची माहिती दिली. त्याचसोबतच एक तक्तासुद्धा दाखवला. त्यावर सिंह, वाघ, बिबट्या, रानमांजर अशी वेगवेगळ्या प्राण्यांची नावं लिहिली होती आणि त्यापुढे त्यांचा वार्षिक खर्च लिहिला होता. त्यांनी मला सांगितले की तारा आणि सूरज नावाचे दोन बछडे आहेत. नगरमधील ऊसाच्या मळ्यातून आम्ही त्यांना वाचवले होते. तेव्हा मी ताराला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. ताराचा वार्षिक खर्च म्हणजे तिचे पोषण आणि औषधोपचार याची जबाबदारी माझ्यावर आहे.”