औषधविक्रीचा घातक ऑनलाईन धंदा!

    दिनांक :02-Nov-2019
चौफेर  
 सुनील कुहीकर 
 
नागवण्यासाठी, फसवण्यासाठी, लूटमार करण्यासाठी, शोषणासाठी, मूर्ख बनवण्यासाठी सामान्य भारतीय माणसाइतकी स्वस्त अन्‌ सहज उपलब्ध असलेली ‘वस्तू’ जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेही सापडणार नाही! जो उठतो तो या बिचार्‍या सामान्यजनांच्या जिवावर उठतो. चार आण्याचे करून बारा आण्यांचा गवगवा करणारे राजकारण असो, दोन रुपयांत तयार होणारे शीतपेयाचे उत्पादन 20 रुपयांत माथी मारणारा व्यापार असो, त्याच्याही हक्काचे असल्याचे ठामपणे सांगून तितक्याच ठामपणे निसर्गाची देण असलेले पाणीही विकत घेण्याची वेळ त्याच्यावर आणणारी व्यवस्था असो, तयार केलेली जिन्नसं गरज असो वा नसो, वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून ग्राहकाच्या पदरात टाकून पैसा कमावण्याची नामी शक्कल लढविणारी उद्योजकांची जमात, गरज नसलेल्या वस्तू विकत घेणे कसे गरजेचे आहे हे पटवून देत, त्यासाठी प्रसंगी कर्ज उपलब्ध करून देणारी मार्केिंटगची तर्‍हा... सर्वांचे लक्ष्य एकच- या देशातला सर्वसामान्य माणूस! मोबाईलधारकांना 24 तास गुंतवून ठेवण्याची ताकद लाभलेल्या नेटपॅकपासून तर नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या, ‘केव्हाही बघता येण्याजोग्या’ सीरियल्सपर्यंत आणि  ॲमॅझॉनवरच्या ‘बाजारा’पासून तर ‘एकावर एक फुकट’ची आरोळी ठोकत ग्राहकांचे खिसे रिकामे करून आपली झोळी भरणार्‍या ‘सेल’पर्यंत... यातील कशाची गरज माणसाचे जीवनचक्र रोखून धरण्याची ताकद बाळगून आहे सांगा? नाहीच काही तसे. पण, या मायावी विश्वाने चित्र तर असे काही निर्माण केले आहे की, बस्स! यातील एकाही गोष्टीशी नाते नसेल तर जीवन अर्थहीन ठरते तुमचे! वाटल्यास कर्ज घ्या, पण मोबाईल फोन कसा महागडाच हवा! एकही विदेश दौरा केलेला नाही उभ्या आयुष्यात? छे! छे! वाया गेली बघा हयात तुमची. पैशाची चिंता कशाला करीत बसलात? ही घ्या ईएमआयची सुविधा अन्‌ करून या लंडनवारी!
 
 
 
यातल्या सार्‍याच बाबींची अर्थहीन श्रेणीत गणना करणे योग्य ठरणार नाही, पण यातील कुठल्याही पर्यायासंदर्भात योग्यायोग्यतेचा विचार मात्र व्हायलाच हवा गांभीर्यानं. ती माणसं त्यांचा माल विकायला बाजार मांडून बसली आहेत. त्यांना त्यांचे गल्ले भरायचेत. शिवाय, वर म्हटल्याप्रमाणे मूर्ख बनवता येईल असा भारतीय मानवीसमूह नावाचा घटक तर सहज उपलब्ध झालाय्‌ त्यांना. त्यालाच नागवणं सुरू आहे सध्या सर्वदूर. सारंकाही ‘घरबसल्या’ उपलब्ध होत असल्याच्या आनंदात किती न्हाऊन निघायचं, त्या मर्यादांचे भान तर त्यालाही राहिलेले नाही. परिणामी, तोही वाहवत चाललाय्‌ या वावटळीत. या वाहवलेल्या घटकाच्या कपाळी मारण्यासाठीच्या वस्तूंची यादीही दिवसागणिक लांबत चालली आहे. त्याचे अपश्रेय कुणाच्यातरी डोक्यातून साकारलेल्या मार्केिंटगच्या यशस्वी गमकाला द्यायचं, की खुद्द ग्राहकांच्या मूर्खपणाला, या प्रश्नाचं उत्तर फारसं कठीण नाहीच. पण, हळूहळू त्याच्या कक्षा रुंदावत चालल्यात, हे मात्र खरं. यात, गेल्या काही दिवसांत भर पडलेले औषधींचे ऑनलाईन मार्केिंटग, हे तर लोकांच्या जीवनाशी चाललेल्या जीवघेण्या खेळाचे भीषण टोक आहे.
 
डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन मेल अथवा व्हाट्‌सअॅपवर पाठवले की, ती सारी औषधं बिलाच्या रकमेत सवलत अदा करून लोकांच्या दाराशी नेऊन देणारी यंत्रणा काही अपवादात्मक प्रकरणात उपयोगाची ठरते म्हणून सरेआम त्याचे सार्वत्रिकीकरण करण्याचा अट्‌टहास सर्वच दृष्टीने घातक ठरत असल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहेत. आजघडीला या देशात निदान साडेआठ लक्ष लोक औषधविक्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. याचा अर्थ, त्याच्या किमान पाच पट लोकांना त्या क्षेत्रात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतो आहे. व्यवसाय आणि रोजगाराची ही व्यवस्था मोडकळीस आणणारी ऑनलाईन औषधविक्री व्यवस्था केवळ तेवढ्यासाठीच धोकादायक मानली जात नाही, तर या माध्यमातून झोपेच्या गोळ्यांपासून तर सेक्सशी संबंधित औषधींपर्यंत, बॉडी बिल्डिंगपासून तर गर्भपातापर्यंतच्या ज्या औषधी विनाप्रिस्क्रिप्शनही उपलब्ध होऊ लागल्या आहेत ती बाब अधिक चिंतनीय आहे. त्याचे सामाजिक दुष्परिणामही अलीकडे समोर येऊ लागले आहेत. शिवाय, या सार्‍या बाबी खाल्ल्या अथवा पिल्या जात असल्याने, थेट मानवी शरीराशी या व्यापार्‍यांचा हा खेळ चालला असल्याचे स्पष्ट होते. त्याचे विपरीत परिणाम सध्यातरी अदृश्य स्वरूपात आहेत. ‘ऑनलाईन खरेदी’च्या चक्रव्यूहात अडकलेल्या तरुणाईला त्या परिणामांची झळ बसत असल्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नसली, तरी त्याचे भविष्यातील चित्र भयावह असणार आहे, हे सांगायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज राहिलेली नाही.
 
आधीच या देशातली खाजगी वैद्यकीय व्यवस्था दिवसागणिक अविश्वसनीय होत चालली आहे. पेशंटचे हाल झाले तरी चालेल, पण डॉक्टरची कमाई झाली पाहिजे, अशा पद्धतीने त्याची रचना तयार झाली आहे. औषधनिर्मात्यांपासून तर डॉक्टर्सपर्यंतच्या लोकांचा सहभाग असलेले कडबोळे पेशंटची लूट व्यवस्थितपणे होईल याची काळजी वाहते. आवश्यक असो वा नसो, पेशंटच्या गळ्यात घातली जाणारी विविध तपासण्यांची, आर्थिकदृष्ट्या न पेलवणारी माळ काही केल्या टाळता येत नाहीय्‌ अशा स्थितीत, दवाखान्यांना लागून स्वत:चे किंवा आपल्या नातेवाईकांचे औषधालय उघडण्याची बहुतांश डॉक्टरांची धंदेवाईक तर्‍हाही आता लोकमान्य ठरू लागली आहे. औषधनिर्मात्या कंपन्यांची विक्री वाढविण्याची जबाबदारी जणू आपल्याच खांद्यावर असल्यागत पेशंटला त्या गोळ्या घेण्याची शिफारस करून, कारपासून तर विदेश दौर्‍यापर्यंतच्या कंपनी-प्रायोजित बक्षिसांसाठी ‘पात्र ठरण्याची’ जी शर्यत या धंद्यातील लोकांमध्ये लागली आहे, ती खरोखरीच लाजिरवाणी आहे. अशात आता औषधविक्रीच्या असुरक्षित, जीवघेण्या ऑनलाईन व्यवसायाची भर पडते आहे. यातही शेवटी, छळ सामान्य माणसाचाच मांडला जाणार आहे!
 
आजघडीला निदान 50 ऑनलाईन औषध विकणार्‍या कंपन्या कार्यप्रवण झाल्या आहेत. खरंतर अशा रीतीने व्यवसाय करण्यास त्यांना परवानगी नाही. पण, अद्याप त्यांना कुणी रोखलेलेही नाही, ही वस्तुस्थिती आहे. ग्राहकाने डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन पाठवायचे किंवा त्याला हव्या त्या औषधींची मागणी त्याने नोंदवायची की पुरे. काही क्षणात सारी जिन्नसं त्याच्या दारात हजर! म्हणायला खूप चांगली सुविधा आहे ही. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्याचे मोल खूप जास्त. पण, जाणीवपूर्वक नजरेआड केला जाणारा सुरक्षिततेचा मुद्दा त्याहून गंभीर आहे. एखाद्या मेडिकल स्टोअर्समधे गेलं तर झोपेच्या गोळ्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देत नाही कुणी. चार प्रश्न विचारले जातात. इथेतर कुणालाच कशाचीच आडकाठी नाही. मागणी केली की औषधं हजर. मानवी शरीरावर होणार्‍या त्याच्या रासायनिक प्रक्रियांची, क्वचितप्रसंगी उद्भवणार्‍या त्याच्या दुष्परिणामांची चिंता वाहणार कोण? सारेच बाजार मांडून बसलेत इथे. पैसा कमावण्याशी मतलब राखून आहेत सारे. विदेशात औषधी उत्पादने निर्यात करण्यासाठीचे कठोर निकष अन्‌ कठीण अडथळे पार करताना नाकीनऊ येतात त्यांच्या. त्या तुलनेत इथली जनता वेठीस धरणे केव्हाही सोपे, नाही का? त्यांची लूट, त्यांची फसवणूक, त्यांचे शोषण... सारेच सोपे आहे. ना कुठला कायदा आडवा येत, ना कुणी आवाज उठवत. सरसावलाच कुणी कधी दंड थोपटून विरोधात, तर त्याला चीत करायला न्यायापासून तर पोलिसांपर्यंतची सारी यंत्रणा दिमतीला उभी ठाकते इथे, पैसा फेकला की!
 
निदान पोटात घेतली जाणारी औषधंतरी अशी बीअरशॉपीसारखी, परिणामांचा विचार न करता सहज उपलब्ध असू नयेत. त्याच्या रासायनिक प्रक्रियेच्या परिणाम-दुष्परिणामांसाठी कुणीच जबाबदार राहणार नाही, अशा पद्धतीने कुठल्याही आडकाठीविना त्याची उपलब्धता, अत्याधुनिक युगाची साक्षीदार असेलही, अपवादात्मक प्रकरणात त्याची उपयोगिताही सिद्ध होईल, पण म्हणून हा गोरखधंदा समर्थनीय कसा ठरवायचा? तो सार्वजनिक हिताचा कसा ठरवायचा?
आज सनफार्मासारखी भारतातील सर्वात मोठी औषध उत्पादक कंपनी हलाखीच्या आर्थिक स्थितीतून जाते आहे आणि मेड प्लस, अपोलो, नेट मेट, जेनेरिकोसारख्या औषध विक्रेत्या कंपन्या मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी ओतलेल्या पैशाच्या भरवशावर व्यवसायाचे जाळे विणण्याच्या, विस्तारण्याच्या तयारीत आहेत. हे सारे कमी आहे की काय म्हणून, काही लोक ऑनलाईन पोर्टल उघडून लोकांच्या जिवाशी खेळायला सरसावले आहेत. यातून छोटे छोटे दुकानदार अडचणीत येणार असल्याचे संकट तर आहेच, पण सामान्य माणूस त्यात होरपळला जाणार आहे आणि त्याचा कुणीही वाली नाही, ही खरी शोकांतिका आहे!
9881717833