'धुरळा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

    दिनांक :20-Nov-2019
मुंबई,
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू असतानाच ट्विटरवर काही मराठी कलाकारांनी सुरू केलेला #पुन्हानिवडणूक? या हॅशटॅगमुळे चांगलाच वादंग निर्माण झाला. या पोस्ट राजकीय नसून आगामी 'धुरळा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत्या असे कलाकारांनी स्पष्ट केले आहे. याच 'धुरळा' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
 

 
हव्वा कुनाची रं? ... हव्वा आपलीच रं! असे म्हणत दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या 'धुरळा' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. गावाकडच्या मातीत मुरलेले राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा 'धराळा' हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत. त्यामुळे आता चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
 
'धुरळा' चित्रपटाविषयी आणि पुन्हानिवडणूक? या हॅटशॅगविषयी बोलताना दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले की, '#पुन्हानिवडणूक?' हा चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग आहे. त्यामुळे काही कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या हॅशटॅगचा वापर केला. परंतु, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी त्याचा काहीही संबंध नाही.