शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा; शरद केळकरचा व्हिडिओ व्हायरल

    दिनांक :20-Nov-2019
शिवकालीन इतिहासाच्या पानांमधील तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मावळ्यांचे अनन्यसाधरण महत्व आहे, हे आपण जाणतोच. चित्रपटात नरवीर तान्हाजी मालुसरे यांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अजय देवगण साकारणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनावेळी चित्रपटातील काही कलाकारांनी मीडियाशी संवाद साधला. दरम्यान, असा काही किस्सा घडला की उपस्थित असलेल्या सर्वांनी अभिनेता शरद केळकरवर टाळ्यांचा वर्षाव केला.
 

 
तान्हाजी : द अनसंग वॉरियर चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित करताना अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना चित्रपटाशी संबंधीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. चित्रपटात शरद केळकर साकारत असलेल्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न विचारताना एकाने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. शरद केळकरला ते खटकले आणि त्याने ताबडतोब त्या व्यक्तीला महाराजांना ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणायला सांगितले. शरदच्या मनातील शिवाजी महाराजांचा आदर पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच्यावर टाळ्यांचा वर्षाव केला.
 
 
शरद केळकरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याशिवाय शरद केळकरवरदेखील कौतुकाचा वर्षाव होतोय. 'शरद केळकर भावा तू जिंकलस...', 'याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजां बद्दलचे प्रेम व आदर!', 'हीच तर स्वराज्याची ओळख आहे' असं म्हणत अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर केला आहे.