सुष्मिता सेन दर आठ तासांनी घ्यायची स्टेरॉइड

    दिनांक :20-Nov-2019
मुंबई,
बॉलिवूडमधील तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणार्‍यांमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनचाही समावेश आहे. मनाला आनंद देईल असे आयुष्य जगण्यासाठी सुष्मिता ओळखली जाते. परंतु, तिच्या आयुष्यात एकवेळ अशी आली होती, जेव्हा मरणाच्या दारातून परत आली आहे.
 

 
 
सुष्मिताने याबद्दल एका मुलाखतीत सांगितले की, 2014 मध्ये ’निरबाक’ या बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर ती खूप आजारी पडली होती. तिला नेमके काय झाले हे डॉक्टरांनाही नेमके कळू शकले नाही. एके दिवशी तर ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुष्मिताच्या शरिरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन तयार होत नसल्याचे अनेक चाचण्या केल्यानंतर निदान लागले. या हार्मोनच्या अभावामुळे शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. या आजारातून वाचण्यासाठी तिला दर आठ तासांनी विशिष्ट प्रकारचे स्टेरॉईड घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यानंतर तिने स्टरॉईड घेणे सुरू केले.
या आजारपणानंतर पुढची दोन ते तीन वर्षे माझ्यासाठी खूप त्रासदायक होती. मला दर आठ तासांनी ते स्टेरॉइड घ्यावे लागायचे. त्यामुळे मी जिवंत तर होते, पण माझ्या शरीरावर त्याचे परिणाम होऊ लागले होते. माझे केस गळायचे, वजन झपाट्याने वाढू लागले होते. तुम्ही माझे जुने फोटो पाहिले तर हा बदल तुमच्या सहज लक्षात येऊ शकेल.
मी या आजारावर बर्‍याच ठिकाणी उपचार घेतले. या आजारपणाने खचून न जाता, आजाराशी दोन हात करायचे ठरवले. मी योग सुरू केला. व्यायाम करायला लागले. आनंदी राहायचे असे मी ठरवले. त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी मला स्टेरॉईड घ्यायची गरज नसल्याचे आणि माझ्या शरिरात पुन्हा एकदा कोर्टिसोल बनणे सुरू झाल्याचे तिने सांगितले.