रात्रंदिन आम्हा क्रिकेटचा आनंद!

    दिनांक :21-Nov-2019
आशिया खंडात, त्यातल्या त्यात भारत देशात लोकांना क्रिकेटचे फार वेड आहे. आज क्रिकेट हा खेळ खेळणार्‍या देशांमध्ये सर्वाधिक देश आशिया खंडातील आहेत. यात भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे प्रमुख देश असून, अलीकडेच संयुक्त अरब अमिरातचा संघही दणकेबाज कामगिरी करीत आहे. अशा या क्रिकेटने गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिकतेची कास धरल्यामुळे, आज विविध देशांमध्ये क्रिकेट संघटनांप्रमाणेच राज्यांमधील संघटनाही आर्थिकदृष्ट्या मजबूत झाल्या आहेत. आधी कसोटी क्रिकेटचा जमाना होता. या काळात, लवकरच मर्यादित षट्‌कांचे सामने सुरू होतील आणि खेळाडूंच्या पाठीवर इतर खेळांप्रमाणेच नंबर राहतील, असं भाकीत कुण्या क्रिकेट पंडिताने वर्तविलं असतं, तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. हा सभ्य साहेबांचा खेळ आहे, यात असे बाजारूपण येऊच शकत नाही, असेच कुणीही म्हणाले असते. 
 
कॅरी पॅकर आला तेव्हा काय गजहब झाला होता. पॅकर सर्कसमध्ये खेळायला जाणार्‍या खेळाडूंवर राष्ट्रीय संघांनी बंदी वगैरे घातली होती. क्रिकेटचा धंदा करतोय म्हणाले हा माणूस... मात्र, काहीच वर्षांत इतर क्रिकेट देशांनीही पॅकरचाच कित्ता गिरविणे सुरू केले. मग एकदिवसीयपाठोपाठ टी-२० क्रिकेट उदयास आले. लोकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, या खेळांचे सामने मग विद्युतझोतात दिवस-रात्र सत्रात खेळले जाऊ लागले. त्यासाठी लाल चेंडूऐवजी पांढर्‍या चेंडूचा वापर केला जाऊ लागला. खेळाडूंच्या पाठीवर नंबर आले. या झटपट क्रिकेटच्या काळात क्रिकेटचे कसोटी सामने म्हणजे, ‘आजोबा आहेत तोवर वाडा आहे; ते गेलेत की मग तिथे फ्लॅट स्कीम उभी राहील,’ असे झाले आहेत. गावसकर, बेदीची पिढी आहे जगात तोवरच कसोटी क्रिकेट राहील, असेच लक्षण आहे. कारण आता ‘टी-१०’पर्यंत हा खेळ आक्रसला आहे. कसोटी सामन्यांना मैदानावरच तर दूरच, दूरचित्रवाणीवरील प्रक्षेपण बघायलाही प्रेक्षक मिळत नाहीत! त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये उत्कंठा वाढावी, थरार निर्माण व्हावा यासाठी मग त्यात काही बदल केले जात आहेत. दिवस-रात्र कसोटी हा त्याचाच प्रकार. साहेबांच्या देशात हा प्रकार बर्‍यापैकी रुजला आहे. भारतासारखा मोठा क्रिकेट देश अपवाद होता.  
 
 
आता कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर होणार्‍या भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याद्वारे दिवस-रात्र कसोटीचा आपल्या देशात पर्वारंभ होत आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेश संघ पहिल्यांदाच दिवस-रात्र सत्राचा कसोटी सामना खेळणार आहे. वनडे क्रिकेट आधी प्रत्येकी 60 षट्‌कांचे खेळण्यात आले. पुढे त्यात काटछाट करून ते 50 षट्‌कांचे करण्यात आले. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, तसेच शाळा-महाविद्यालय आणि कार्यालयातील प्रेक्षकांची व्यग्रता लक्षात घेता नंतर हे सामने दिवस-रात्र सत्रात घेतले जाऊ लागले. मग टी-२०चा जन्म झाला, पुढे आयपीएल आले आणि दिवस-रात्र सत्राच्या क्रिकेटला सुगीचे दिवस आले. ही बाब हेरून देशातील अनेक क्रिकेट संघटनांनी आपल्या येथे विद्युतझोताची स्थायी व्यवस्थाच करून टाकली. त्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सप्रमाणे नागपूरच्या व्हीसीए, जामठा या स्टेडियमचा समावेश झाला. कोलकाता क्रिकेट संघटनेच्या देखरेखीखाली या ईडन गार्डन्सचा कार्यभार पाहिला जातो. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सौरव गांगुली हा मधल्या काळात या बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होता आणि अलीकडेच त्याच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे आणि त्याच्याच नेतृत्वात हा ऐतिहासिक कसोटी सामना कोलकात्याला खेळला जाणार आहे.
 
विशेष म्हणजे या सामन्यासाठी गुलाबी चेंडूचा वापर केला जाणार आहे. या गुलाबी चेंडूच्या वापरामुळेच कोलकातानगरीला गुलाबी रंगाचा टच देण्यात आला आहे. सर्वकाही गुलाबी रंगाने रंगवून लोकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. वनडेत पांढरा आणि कसोटीत गुलाबी असे चेेंडूंचे वापर होऊ लागले आहेत. मागे, एकदा नागपूरला दिवस-रात्र सत्रात वनडे सामना खेळला गेला होता तेव्हा पांढर्‍या चेंडूचा वापर करण्यात आला होता. तेव्हा काही निवडक पत्रकारांशी बोलताना फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला होता की, पांढरा चेंडू वापरायचा असेल तर मैदानातील सर्व पार्श्वभाग काळा करायला पाहिजे, तेव्हाच सामन्यात मजा येते. त्या वेळी जामठा स्टेडियमच्या आतील भिंती सर्व पांढर्‍या होत्या. ही पार्श्वभूमी पाहता, गुलाबी चेंडूसाठीही अशी काळी किंवा  विरोधाभासी रंगाची पार्श्वभूमी असायला हवी जेणेकरून गोलंदाज आणि फलंदाज यांना त्याचा त्रास होणार नाही आणि सामन्यात रंगत येईल. क्रिकेटचे आंतरराष्ट्रीयस्तरावर संचालन करणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मान्यता दिल्यानंतर पहिला दिवस-रात्र सत्राचा कसोटी सामना 27 नोव्हेंबर 2015 रोजी ॲडिलेड येथील ॲडिलेड ओव्हल मैदानावर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. त्यानंतर आतापर्यंत पुरुषांचे अकरा आणि महिलांचा एक कसोटी सामना दिवस-रात्र सत्रात रंगला आहे.
 
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात 2017 च्या नोव्हेंबरमध्ये सिडनीत झालेला हा विद्युतझोतातील महिलांचा कसोटी सामना अनिर्णित अवस्थेत सुटला होता. पुरुषांमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे या बहुतांश संघांना दिवस-रात्रच्या कसोटी सामन्याचा अनुभव आहे. त्यातही ऑस्ट्रेलिया संघाला जास्त आहे. भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ प्रथमच दिवस-रात्रचा कसोटी सामना खेळणार आहेत. इतिहासात विद्युतझोतात दुसरा कसोटी सामना दुबईत पाकिस्तानच्या यजमानपदाखाली झाला आणि वेस्ट इंडीजविरुद्धचा हा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यानंतर तिसर्‍या सामन्यात ॲडिलेड येथे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमविले, चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानेच ब्रिस्बेन येथे पाकिस्तानवर मात दिली, पाचव्या सामन्यात इंग्लंडने बर्मिंगहॅम येथे वेस्ट इंडीजविरुद्ध खेळताना एक डाव व 209 धावांनी मोठा विजय नोंदविला. सहाव्या सामन्यात श्रीलंकेने दुबई येथे पाकिस्तानचा, सातव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ॲडिलेड येथे इंग्लंडला, आठव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पोर्ट एलिझाबेथ येथे झिम्बाब्वेला, नवव्या सामन्यात न्यूझीलंडने ऑकलंड येथे इंग्लंडला, दहाव्या सामन्यात श्रीलंकेने ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडीजचा आणि अकराव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केलेला आहे.
 
विशेष बाब म्हणजे आतापर्यंत खेळले गेलेले विद्युतझोतातील अकराही कसोटी सामने निकाली लागले आहेत. ही सर्व पार्श्वभूमी बघता, भारतासारख्या बलाढ्य संघाच्या या ऐतिहासिक कसोटीकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला डावाने पराभवाची धोबीपछाड दिली असली, तरी कोलकात्यातील बांगलादेश संघाला अनुकूल असलेले वातावरण पाहता, हा संघ या सामन्यात काही कमाल करतो का, याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. कोलकाता शहर पूर्वेकडे असल्यामुळे तेथे अंधार लवकर पडतो, त्यामुळे दिवसाचा कसोटी सामना मधेच थांबवावा लागत होता. आता हा प्रयोग यशस्वी झाला तर क्रिकेटप्रेमींची आणखी एक समस्या सुटणार आहे. मात्र, सध्याचे थंडीचे दिवस बघता दिव्याभोवती गोळा होणार्‍या किड्यांचा त्रास होण्याची शक्यता आहे. एकूणच काय की, या ऐतिहासिक कसोटी सामन्याकडे आता सार्‍यांचे लक्ष लागलेले आहे...