उद्धवा, अजब तुझे (न आलेले) सरकार...!

    दिनांक :21-Nov-2019
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार
 
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे, पण संसदभवनाच्या कॉरिडॉरमध्ये सर्व पक्षांचे खासदार आणि पत्रकार एकच प्रश्न एकदुसर्‍याला विचारत आहेत, तो म्हणजे महाराष्ट्रात सरकार कधी बनणार आणि कुणाचे बनणार? या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सोडून सध्यातरी कुणाचजवळ नाही! 
 
 
राज्यात स्थापन होणार्‍या कोणत्याही सरकारमध्ये शरद पवार यांची भूमिका प्रमुख राहणार आहे. मग ते सरकार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे असो, की भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे. तिसरा आणि अंतिम पर्याय म्हणजे आज पूर्णपणे अशक्यप्राय वाटत असलेले भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असो. 
 
उद्या महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचेच सरकार स्थापन झाले, तरी त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शरद पवार यांचे योगदान राहणार आहे. शरद पवार यांना डावलून राज्यातील कोणत्याच पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही. त्यामुळे पवार किंगमेकरच्या भूमिकेत गेले आहेत. त्यामुळे पवारांच्या पुढच्या भूमिकेवर महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.
  
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता जवळपास एक महिना होत आला आहे. पण, राज्यात कुणालाच सरकार स्थापन करता आलेले नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागली. राज्यातील जनतेने स्पष्ट जनादेश दिला असताना भाजपा-शिवसेना युतीला शिवसेनेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपले सरकार स्थापन करता आले नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याच्या दृष्टीने ही बाब लाजिरवाणी म्हणावी लागेल. कारण शिवसेनेच्या सत्तालोभी भूमिकेचा फटका राज्यातील शेतकर्‍यांना आणि जनतेला बसत आहे. 
 
भाजपा आणि शिवसेनेने युती करून विधानसभा निवडणूक लढवली. जनतेने युतीच्या बाजूने आपला कौलही दिला. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेने ‘शेंडी तुटो वा पारंबी’ अशी भूमिका घेतल्यामुळे राज्यात सरकार स्थापन करता आले नाही, त्याची परिणती भाजपा आणि शिवसेना युती तुटण्यात झाली. आता भाजपाला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मदतीने शिवसेना राज्यात सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. 
 
पण राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार येईल का, याबाबत ते स्वत: आणि शिवसेनेचे अनधिकृत वाचाळ प्रवक्ते संजय राऊत सोडून सारेच संभ्रमात आहेत. शिवसेनेच्या नेत्यांना आणि आमदारांनाही सरकार बनवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसआपल्याला पाठिंबा देईल, याची खात्री वाटत नाही. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, हे संजय राऊत वारंवार सांगत आहेत, पण तो कसा येईल, हे ते सांगत नाहीत. कारण ते त्यांनाही माहीत नाही! 
 
शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची इच्छा असून चालणार नाही, तर शरद पवार यांची तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त इच्छा महत्त्वाची आहे. शरद पवारांच्या मनात असेल तर ते एका चुटकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू शकतात, मात्र त्यांच्या मनात नसेल तर शिवसेनेने कितीही आदळआपट केली, तरी त्यांचा मुख्यमंत्री या जन्मात तरी होऊ शकणार नाही. 
 
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी वा त्यांनी शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द खरा करून दाखवण्यासाठी पवार महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार नाहीत. या सार्‍या व्यवहारात आपला किती आणि कसा फायदा आहे, याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या, राज्यातील नव्या राजकीय समीकरणाला हिरवी झेंडी दाखवणार नाहीत.
 
सध्या शरद पवार स्वत:च याबाबत संभ्रमित असल्यामुळे ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळेच ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना खेळवत आहेत. चर्चेचे गुर्‍हाळ चालवत आहेत, ते लांबवत आहेत आणि याचे खापर काँग्रेसवर पर्यायाने सोनिया गांधी यांच्यावर फोडत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा द्यायच्या मुद्यावरून सोनिया गांधी आधीच द्विधा मन:स्थितीत आहेत. कारण, त्यांना फक्त महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे राजकारण करायचे आहे. 
 
शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा दिल्यावर महाराष्ट्रात काँग्रेसचा फायदा होणार असला, तरी संपूर्ण देशात काँग्रेसचे नुकसान झाले तर त्याचे काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. कारण, केरळमधल्या काँग्रेसजनांचा शिवसेनेला पाठिंबा द्यायला विरोध आहे. राहुल गांधी तर केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर विजयी झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या निर्णयाचा राहुल गांधींना फटका तर बसणार नाही ना, अशी चिंता त्यांना सतावत आहे. 
 
मात्र, याही स्थितीत शरद पवार यांनी त्यांना कन्व्हिन्स केले असते, तर त्या महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा द्यायला तयार झाल्या असत्या. पण, आधीच गोंधळलेल्या सोनिया गांधी यांना पवार आणखी गोंधळात टाकत आहेत.
  
शरद पवारांचे राजकारण भल्याभल्या लोकांना गोंधळवून टाकणारे आहे. त्यांचे राजकारण म्हणजे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ यासारखे असते. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत. आपल्या राजकारणातून पवार भल्याभल्यांना कात्रजचा घाट दाखवतात, असे म्हणतात. यावेळी ते उद्धव ठाकरे यांना कात्रजचा घाट दाखवतील, अशी चिन्हे आहेत. 
 
उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधी छायाचित्रकार आहेत. जे समोर असेल ते आहे तसे वा आहे त्यापेक्षा जास्त चांगले दाखवणे हे त्यांचे काम; तर पवार मुरलेले राजकारणी, त्यामुळे जे समोर आहे, त्यापेक्षा, जे समोर नाही ते दाखवणे यात पवार पारंगत आहेत. 
 
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे सरकार बनण्यात आपला जेवढा फायदा आहे, त्यापेक्षा जास्त फायदा या महाशिवआघाडीचे सरकार न बनण्यात आहे, याची खात्री पटली, तर पवार सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेतून अलगदपणे स्वत:ला बाजूला करून घेतील. परिणामी, महाशिवआघाडीचा गर्भपात झाल्याशिवाय राहणार नाही!
 
या सर्व प्रक्रियेत शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसजवळ गमावण्यासारखे काही नाही. त्यांचे कोणतेही राजकीय नुकसान होणार नाही. मात्र, शरद पवार यांनी अशी भूमिका घेतली तर त्याचा सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. शिवसेना पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेला राज्यात आपले सरकार बनवता आले नाही, तर शिवसेनेची गत ‘गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले!’ अशी होणार आहे. शिवसेनेतील काही मोठे नेते आणि आमदार पक्षांतर करून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांना बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. हा सारा प्रकार टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत सरकार बनवण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.
  
मुळात, शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेली असताना, आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शिवसेनेने अजूनही जाहीर केला नाही. आदित्य ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे नेतृत्व करू शकणार नाहीत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुजोर नेते आदित्य ठाकरेंना ते मुख्यमंत्री असले तरी जुमानणार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री करणे हा शेवटचा पर्याय म्हणून स्वत: मुख्यमंत्रिपद घेणे, याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासमोर पर्याय नाही. मात्र, आजतरी हे सर्वच अशक्य आहे.
 
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ‘उद्धवा, अजब तुझे सरकार, लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, पतिव्रतेच्या गळ्‌यात धोंडा, वेश्येला मणिहार!’ असे जनतेला व्यथित अंत:करणाने तरी म्हणता येईल. पण, शरद पवार महाराष्ट्राच्या जनतेला ही संधी देतील का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. कारण, ‘आले पवारांच्या मना, तेथे कुणाचे चालेना...!’
 
9881717817