अमेय वाघची नवी वेब सीरिज ‘ब्रोचारा’ येतेय

    दिनांक :21-Nov-2019
मुंबई,
टीव्ही-सिनेमात चमकल्यानंतर अभिनेता अमेय वाघ वेब दुनियेतही चांगलंच नाव कमावतोय. विविध वेब सीरिजमधल्या अमेयच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. अमेयचं नवीन काय? असा प्रश्न पडणाऱ्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. लवकरच तो 'ब्रोचारा' या नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चार अभिनेते यामध्ये मुख्य भूमिकेत असून, त्यातला एक अमेय आहे. 'लिटील थिंग्ज'फेम ध्रुव सेहगलसोबत अमेय यात स्क्रीन शेअर करणार असल्याचं कळतंय.

 
 
बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमधून अमेय प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात अमेय खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. 'सेक्रेड गेम्स'चा संपूर्ण अनुभव अमेयनं शेअर केला. 'सेक्रेड गेम्स'च्या ऑडिशनसाठी त्याला बोलावण्यात आलं. 'सेक्रेड...'मधल्या एंट्रीबाबत अमेय सांगतो, की, ''सेक्रेड गेम्स' ही माझ्या आवडीच्या वेब सीरिजपैकी एक आहे. अशा सीरिजमध्ये काम करायला मिळावं ही माझी इच्छा होतीच. मी काही ऑडिशन दिल्या आणि माझी एका भूमिकेसाठी निवड झाली. माझा ट्रॅक दिग्दर्शक नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केला. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या 'मसान' या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यामुळे अशा दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं एक नट म्हणून खूप समाधान मिळालं, असंही अमेय म्हणाला. 'ब्रोचारा' बद्दल इतक्यात काही सांगता येणार नसल्याचं अमेयनं सांगितलं असलं तरी त्याचे चाहते मात्र त्याच्या या वेबसिरीजची वाट पाहत आहेत.